सीटीबी : केशव गावित
---
दोन्ही हातांनी लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांची अद्भुत शाळा
शिक्षक केशव गावित यांनी फुलविली सह्याद्रीच्या कुशीत ज्ञानक्रांती
लीड...
सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिवाळी या छोट्याशा आदिवासी पाड्याचे नाव आज शिक्षण क्षेत्रात आदराने घेतले जाते. शहरातील अत्याधुनिक सुविधा, संगणक प्रयोगशाळा किंवा भव्य इमारती नसतानाही या गावातील जिल्हा परिषद शाळेने शिक्षणाची अशी क्रांती घडवून आणली आहे, की तिची दखल अनेक शिक्षक, शिक्षणप्रेमी आणि सामाजिक संस्थांनी घेतली आहे.
हिवाळी हे गाव नाशिकपासून सुमारे सत्तर किलोमीटर अंतरावर, गुजरात सीमेच्या लगत वसलेले आहे. दुर्गम, डोंगराळ आणि आदिवासी बहुल असलेल्या या भागात अनेक मूलभूत सुविधांची कमतरता आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत येथे शिक्षणाची परिस्थितीही सर्वसाधारण होती. मात्र शिक्षक केशव गावित यांच्या अथक परिश्रमांमुळे या शाळेचे रूपांतर गुणवत्तेच्या विद्यापीठात झाले आहे.
आज या शाळेतील विद्यार्थी केवळ अभ्यासातच नव्हे, तर स्मरणशक्ती, बौद्धिक क्षमता, लेखनकौशल्य आणि सामान्यज्ञानाच्या बाबतीतही आश्चर्यचकित करणारी कामगिरी करत आहेत. बालवाडीतील लहान मुले तीसपर्यंतचे पाढे सहज म्हणून दाखवतात, तर मोठ्या वर्गातील विद्यार्थी आठशे अकरा आणि त्यापुढील पाढेही आत्मविश्वासाने म्हणतात. एवढेच नव्हे, तर अनेक विद्यार्थी एकाच वेळी दोन्ही हातांनी स्वतंत्र विषयांचे लेखन करण्याची अद्भुत क्षमता विकसित करत आहेत.
शिक्षण क्षेत्रात कोरोना महामारीने मोठे आव्हान निर्माण केले. अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित झाले. ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध नव्हत्या. मात्र हिवाळीच्या शाळेने या संकटाचे संधीमध्ये रूपांतर केले. नियमित सराव, नियोजनबद्ध अभ्यास आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी या काळातही आपली गुणवत्ता वाढविली.
समाजपरिवर्तनाची चळवळ
या शाळेचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे येथे शिक्षणाला वेळेची मर्यादा नाही. वर्षातील सर्व दिवस सकाळी आठ ते रात्री आठ, अशा बारा तासांच्या कालावधीत शैक्षणिक उपक्रम सुरू असतात. सण, उत्सव किंवा सुट्यांमध्येही विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्न सुरूच असतात. शिक्षण ही केवळ नोकरी नसून समाजपरिवर्तनाची चळवळ आहे, या भावनेतून केशव गावित कार्यरत आहेत.
हिवाळीच्या शाळेत प्रवेश करताच ज्ञानाचे एक वेगळे विश्व पाहायला मिळते. भिंती, खांब, फरशी, छत अशा प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी काही ना काही माहिती उपलब्ध आहे. अक्षरे, संख्या, पाढे, सामान्यज्ञान, विज्ञानविषयक माहिती, स्वच्छतेचे संदेश, पर्यावरण संवर्धनाचे धडे अशा विविध विषयांचा खजिना येथे दिसतो. त्यामुळे विद्यार्थी सतत शिकत राहतात.
बौद्धिक विकासावर विशेष भर
बालवाडीपासूनच विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासावर विशेष भर दिला जातो. वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच मुलांमध्ये वाचन, लेखन आणि गणिताची आवड निर्माण केली जाते. परिणामी, पहिलीत प्रवेश घेणारे विद्यार्थी मराठी वाचन, गणिताच्या मूलभूत क्रिया, पाढे आणि भाषाज्ञानात प्रगत असतात. आत्मविश्वास, स्पष्ट उच्चार आणि शिकण्याची उत्सुकता हे या विद्यार्थ्यांचे विशेष गुण आहेत.
केशव गावित यांचे स्वप्न केवळ शाळा चालविण्याचे नाही, तर त्यांना या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांमधून भावी सनदी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि समाजनेते घडवायचे आहेत. त्यासाठी ते विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर विशेष भर देतात. सामान्यज्ञान, संविधान, देश-विदेशातील माहिती, भूगोल, इतिहास यांसारख्या विषयांचा सातत्याने अभ्यास घेतला जातो.
शाळेला भेट देणारे शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञ येथे येऊन अक्षरशः थक्क होतात. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, त्यांची स्मरणशक्ती, प्रश्नांना दिलेली अचूक उत्तरे आणि दोन्ही हातांनी लेखन करण्याचे कौशल्य पाहून प्रत्येक जण प्रभावित होतो. अनेक शिक्षकांनी ही शाळा म्हणजे शिक्षणातील प्रयोगशाळाच असल्याचे मत व्यक्त केले आहे.
म्हाळसाकोरे येथील आरूढ विद्यालयाच्या शिक्षकांनी दिलेल्या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता त्यांची क्षमता अधिक स्पष्ट झाली. जगातील देश व त्यांच्या राजधानी, भारतीय राज्ये, संविधानातील कलमे, सामान्यज्ञान, गणित आणि विविध शैक्षणिक विषयांवरील त्यांचे प्रभुत्व पाहून शिक्षक भारावून गेले. दुर्गम भागातही अशी गुणवत्ता दडलेली असते, फक्त तिला योग्य दिशा देणारा शिक्षक हवा असतो, याची प्रचिती सर्वांना आली.
या यशामागे केवळ एका शिक्षकाची मेहनत नाही, तर ग्रामस्थ, पालक, प्रशासन आणि विविध सामाजिक संस्थांचे सहकार्यही महत्त्वाचे आहे. समाजाच्या सहभागातून शिक्षण अधिक प्रभावी होऊ शकते, याचे हिवाळी हे जिवंत उदाहरण आहे.
आज हिवाळीची ही शाळा अनेकांसाठी प्रेरणास्थान बनली आहे. सुविधा नसल्या तरी इच्छाशक्ती, समर्पण आणि योग्य मार्गदर्शन असेल तर गुणवत्तेची शिखरे गाठता येतात, हे या शाळेने सिद्ध करून दाखविले आहे. सह्याद्रीच्या कुशीतून उगवलेली ही ज्ञानज्योत भविष्यात अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळविणार आहे. शिक्षक केशव गावित आणि त्यांच्या विद्यार्थ्यांची ही गौरवगाथा खऱ्या अर्थाने ग्रामीण शिक्षणातील परिवर्तनाची प्रेरणादायी कहाणी आहे.
---
चौकट
यशाची ठळक वैशिष्ट्ये
- बालवाडीतील मुले तीसपर्यंतचे पाढे म्हणतात
- विद्यार्थी दोन्ही हातांनी एकाच वेळी लेखन करतात
- शेकडो पाढे तोंडपाठ
- संविधान, भूगोल व सामान्यज्ञानात प्रावीण्य
- वर्षातील सर्व दिवस शैक्षणिक उपक्रम
- दुर्गम भागात गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आदर्श
---
चौकट
शिक्षक केशव गावित यांची कार्यपद्धती
- बालवाडीपासून व्यक्तिमत्त्व विकासावर भर
- सातत्यपूर्ण सराव आणि पुनरावृत्ती
- अनुभवाधारित शिक्षण
- सामान्यज्ञान आणि स्पर्धा परीक्षांची तयारी
- पालक व ग्रामस्थांचा सहभाग
- शिस्त, स्वावलंबन आणि आत्मविश्वासाची जडणघडण
---
कोट
सुविधांपेक्षा जिद्द मोठी असते. दुर्गम भागातील विद्यार्थीदेखील योग्य मार्गदर्शन मिळाल्यास राष्ट्रीय स्तरावर यश मिळवू शकतात. शिक्षणासाठी भव्य इमारती, महागडी साधने किंवा आधुनिक तंत्रज्ञान आवश्यकच असे नाही. समर्पित शिक्षक, विद्यार्थ्यांची जिज्ञासा आणि समाजाचा सहभाग असेल तर दुर्गम भागातही गुणवत्तेची क्रांती घडू शकते. प्रयोगशील शिक्षणातूनच ग्रामीण भारतातील असंख्य विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे आकाश मिळू शकते.
- केशव गावित, शिक्षक