धुळे ः टुडे १ साठी, संक्षीप्त
--
आदेशाचे उल्लंघन;
चौघांविरुद्ध गुन्हा
धुळे : महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर विनापरवानगी बॅनर लावून शासकीय आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चौघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मनपा कर्मचारी सागर जकातदार (रा. जुने धुळे) यांच्या फिर्यादीनुसार ही कारवाई झाली. महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या गेट क्रमांक एकवर १९ जूनला सकाळी सातच्या सुमारास मनपा गेट बंद आंदोलनासंदर्भातील बॅनर लावण्यात आले होते. महापालिका परिसरात कोणत्याही प्रकारचे बॅनर लावण्यास मनाई असताना संबंधितांनी विनापरवानगी बॅनर लावून प्रवेशद्वाराचे विद्रुपीकरण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी बापू बागूल, शंकर खरात, दीपककुमार बागूल (तिघे रा. धुळे) तसेच बॅनर छपाई करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
-
महिलेचा विनयभंग;
संशयितावर गुन्हा
धुळे : बाळापूर (ता. धुळे) येथे परिवारासह घराच्या छतावर झोपलेल्या महिलेशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका संशयिताविरुद्ध धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ही घटना १८ जूनला मध्यरात्री घडली. झोपेत असताना संशयिताने महिलेच्या अंगाला स्पर्श करून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. जाग आल्याने महिलेने आरडाओरड केली. त्यामुळे संशयिताने तेथून पळ काढला. घाबरलेल्या महिलेने परिवारासह १९ जूनला धुळे तालुका पोलिस ठाण्यात लेखी फिर्याद दिली. त्यानुसार संशयित सुमित रमेश शेलार (रा. बाळापूर, फागणे) याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला.
-
मस्करीच्या रागातून
लोखंडी पाइपने हल्ला
धुळे : मित्रांमध्ये गप्पा सुरू असताना मस्करी केल्याच्या रागातून एकास शिवीगाळ करत तिघांनी लोखंडी पाइपने मारहाण केल्याची घटना पुरमेपाडा (ता. धुळे) येथे घडली. सोनू अजय सोनवणे व अशोक गब्बर ठाकरे हे तीन जूनला सायंकाळच्या सुमारास बसले होते. त्यात दोघांमध्ये होणाऱ्या गप्पांतून सोनू याने अशोक याची मस्करी केली. याचा राग आल्याने अशोक याने सोनू याला शिवीगाळ व मारहाण केली. त्यावेळी अशोक याचे दोघे भाऊ विशाल गब्बर ठाकरे व संदीप गब्बर ठाकरे हे तेथे आले. त्यांनी सोनू याला मारहाण केली. तसेच लोखंडी पाइपने त्याच्या डोक्यावर मारून दुखापत केली. सोनू सोनवणे याच्या फिर्यादीवरून धुळे तालुका पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध नुकताच गुन्हा दाखल झाला.
-
आत्महत्येस प्रवृत्त;
तीन संशयित ताब्यात
धुळे : चारित्र्यावर संशय घेऊन एका विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सोनगीर पोलिस ठाण्यात तीन संशयितांविरुद्ध नुकताच गुन्हा दाखल झाला. बुरझड (ता. धुळे) येथील ३५ वर्षीय महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन संशयित भगवान मासुळे, कमलबाई मासुळे व किसन मासुळे (तिघे रा. बुरझड) यांनी तिचा छळ केला. त्यास कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप समाधान नारायण हालोर (रा. चितोड, ता. धुळे) यांनी तक्रारीत केला.
-
अस्तित्व लपविणारा
पोलिसांच्या ताब्यात
धुळे : चितोड (ता. धुळे) येथे गुन्ह्याच्या उद्देशाने अस्तित्व लपवून मध्यरात्री फिरणाऱ्या गौतम सुनील पवार (वय २०) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. दोन जूनला पहाटेच्या सुमारास संशयित गौतम पवार हा चितोड गावात तोंडाला रुमाल बांधून संशयास्पदरीत्या वावरत होता. एका टपरीच्या आडोश्याला स्वतःचे अस्तित्व लपविताना पोलिस कर्मचारी समाधान पाटील यांनी त्याला पकडले. याप्रकरणी त्याच्यावर धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
-