फोटो : NSK26H22306, NSK26H22307
…
आदिवासी आयुक्तालयासमोर भरपावसात आंदोलन
---
विद्यार्थ्यांचा डीबीटी निधी रखडला; दुपारनंतर पैसे वर्ग होण्यास सुरुवात
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २३ : प्रलंबित डीबीटी निधीसाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी मंगळवारी (ता. २३) आदिवासी विकास आयुक्तालयासमोर भर पावसात ठिय्या मांडून आंदोलन केले. या वेळी सहायक आयुक्त दिगंबर चव्हाण यांना मागण्यांचे निवदेन देण्यात आले. दरम्यान, सायंकाळी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर पैसे वर्ग होण्यास सुरुवात झाली.
पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजनेंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य व इतर आवश्यक खर्च भागविण्यासाठी शासनाकडून निधी दिला जातो. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ संपले तरीही हा निधी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नाशिकसह नांदेड, अमरावती येथील विद्यार्थ्यांनी मंगळवारी आदिवासी आयुक्तालयासमोर भर पावसात ठिय्या आंदोलन केले. या वेळी ‘डीबीटी आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा’ अशा घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला होता. या वेळी प्रशांत गावंडे, कल्पेश खंबाईत, तेजस पाचोरे, दत्ता खरोटे आदी उपस्थित होते.