पान एक मेन ( भाऊ अजून एक फोटो येईल )
--------------------------
22314, 22312, 16966
नाशिक : मंगळवारी शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. भर पावसात माग करताना वाहनचालक. दुसऱ्या छायाचित्रात दिंडोरी रोडवर साचलेले पावसाचे पाणी. तिसऱ्या छायाचित्रात नाशिक रोड भागात सुरु असलेला पाऊस.
वरुणराजा बरसला; चार तासांत १८.९ मिलिमीटर पाऊस
शहरात दिवसभर रिमझिम; वडाळा भागात रोड खचला; अनेक रस्त्यांना तळ्याचे स्वरूप
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २३ः बहुप्रतीक्षित मॉन्सूनने मंगळवारी (ता.२३) संपूर्ण शहराला व्यापले. अवघ्या तीन ते चार तासांमध्ये शहरात १८.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसाच्या हजेरीने दिलासा मिळाला. शहरासह उपनगरीय भागांतील अनेक रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले. तर अनेक ठिकाणी विकास कामासाठी खोदलेल्या रस्त्यांमध्ये पाणी साचले. यातच वडाळा गावात रस्ता काहीसा खचला.
जून संपत आला असताना, मॉन्सूनमध्ये झालेल्या विलंबामुळे भीषण पाणी टंचाई जाणवत होती. यामुळे महापालिका प्रशासनाला पाणी कपातीचा निर्णय घ्यावा लागला. दुसरीकडे प्रखर सूर्यकिरणांमुळे उकाडा असह्य झालेला होता. ही परिस्थिती लक्षात घेता, नाशिककर पावसाची आतुरतेने वाट बघत होते. सोमवारी (ता.२२) शहरातील काही भागांमध्ये जोरदार सरी बरसल्या. मंगळवारी सकाळपासून ढग दाटून आले होते. दुपारी बाराच्या सुमारास शहरभर पावसाला सुरुवात झाली. व पुढील तीन ते चार तासांमध्ये १८.९ मिलिमीटर पाऊस बरसला. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची रिमझिम सुरुच होती.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरभर रस्त्यांची कामे सुरु आहे. पावसाच्या पहिल्या हजेरीतच अनेक रस्ते, महत्त्वाचे चौक यांना तळ्याचे स्वरूप आले.
------------
पाऱ्यात घसरणीने दिलासा
एप्रिल महिन्यापासून नाशिकचा पारा चाळीस अंशापर्यंत पोहचला होता. यंदाच्या हंगामात कमालीचा उकाडा जाणवत असल्याने नाशिककर हैराण झाले होते. जूनमध्ये नाशिकचे कमाल तापमान ३५ अंश पेक्षा अधिक राहात होते. मात्र पहिल्याच पावसाच्या सरींनी पाऱ्यात घसरण होण्यास मदत झाली आहे. मंगळवारी नाशिकचे किमान तापमान २३.६ अंश तर कमाल तापमान ३१.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.
--------
पावसामुळे फुटी रस्ता खचला
इंदिरानगर : दुपारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे वडाळा गावाकडे जाणारा शंभर फुटी रस्ता खचल्याने वाहनधारकांची मोठी तारांबळ उडाली. या रस्त्यातून ड्रेनेजची पाइपलाइन टाकण्यात आली आहे. पण त्यावर फक्त माती होती. माती दबल्याने पावसाने दबल्यामुळे हा रस्ता खचला. सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या अगदी समोर हा रसला खचला. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा झाला. बहुतांश ठिकाणचे रस्ते पाइपलाइन बुजवल्यानंतर त्यावर अपेक्षित असलेले डांबरीकरण झाले नाही. त्यामुळे सर्वत्र चिखल झाला. तसेच इंदिरानगर आणि राणेनगर बोगदा भागात सुरू असलेल्या समांतर पुलांच्या कामा दरम्यान असलेल्या बाजूच्या खटक्यांमध्ये देखील पाण्याची तळी साचल्याने नागरिकांना जपून वाहने चालवावी लागली.
पंचवटीत ठिकठिकाणी पाण्याचे तळे
पंचवटी : परिसरात मंगळवारी (ता.२३) दुपारी साडेबाराला पावसाने दमदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली होती. पंचवटी विभागात रस्त्यालगत ठिकठिकाणी पाण्याचे तळे साचले. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पावसाने चांगलीच हजेरी लावली. जवळपास दीड ते दोन तास पाऊस सुरू होता. मखमलाबाद गाव, आडगाव, वरवंडी, म्हसरूळ, नांदुर, मानूर याठिकाणी दमदार पाऊस झाला. पावसामुळे भाजीपाला आणि फळांचे नुकसान होऊन विक्रेत्यांना आर्थिक फटका बसला. संततधारमुळे परिसरातील अनेक रस्ते, चौक आणि सिग्नल परिसर जलमय झाले. रस्त्याच्या मध्यभागी, दुभाजकाजवळ, सिग्नल परिसरात तसेच पादचाऱ्यांच्या मार्गांवर पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
नाशिक रोडला दमदार हजेरी
नाशिक रोड : मंगळवारी (ता. २३) दुपारनंतर दमदार पावसाने हजेरी लावली. तब्बल अठरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या या पावसामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नाशिक रोडकरांना दिलासा मिळाला. पावसाने वातावरणात गारवा पसरला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, बिटको पाईट, दत्त मंदिर चौक, जेलरोड, देवळालीगाव, विहीतगाव, चेहेडी, पळसे, शिंदे, उपनगर, नेहरुनगर, यासह विविध भागांत दुपारच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. दुपारच्या सुमारास काळ्या ढगांनी आकाश व्यापले आणि पावसाच्या सरींनी संपूर्ण परिसर चिंब भिजवला. काही ठिकाणी गारांसह पाऊस झाला. अचानक कोसळलेल्या पावसामुळे रस्त्यावरील पादचारी आणि वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसामुळे शहरातील अनेक रस्ते, चौक आणि सिग्नल परिसरात पाणी साचले.