लोगो :
सिंहस्थ- कुंभमेळा
नाशिक परिक्रमा मार्गाला गती
पिंपळगाव बहुलातील १५ हजार चौरस मीटर जागा ‘एमएसआरडीसी’ला मोफत
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २३ : सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराभोवतीचा वाहतूक ताण कमी करण्यासाठी आखण्यात आलेल्या परिक्रमा मार्ग अर्थात रिंगरोड प्रकल्पाला आता महापालिकेची थेट साथ मिळाली आहे. प्रकल्पासाठी लागणारी पिंपळगाव बहुला येथील १५ हजार २९७ चौरस मीटर जागा विनामूल्य हस्तांतरित करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
हा प्रस्ताव आगामी महासभेत मंजुरीसाठी येणार आहे. महापालिकेच्या मालकीची ही जागा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला देण्यात येईल. यात सर्व्हे क्र. १६८ मधील ४,७४० चौ.मी., सर्व्हे क्र. १६९ मधील ५७ चौ.मी. आणि डीपी रस्त्याच्या बांधित क्षेत्राचा समावेश आहे. राज्य शासनाच्या निधीतून एमएसआरडीसी हा रिंगरोड उभारणार असून, काम पूर्ण झाल्यावर संपूर्ण मालमत्ता पुन्हा महापालिकेकडे सुपूर्द केली जाईल. शहराचा विस्तार आणि सिंहस्थासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या पार्श्वभूमीवर हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. सध्या नाशिकमधील अंतर्गत रस्त्यांवर जड वाहने आणि बाह्य वाहतुकीचा ताण वाढला. परिक्रमा मार्ग सुरू झाल्यावर ही वाहतूक थेट शहराबाहेरून वळवली जाईल. सुमारे १२५ किलोमीटर लांबीचा हा रिंगरोड डीएडीओ जंक्शन, आडगाव, दिंडोरी रोड, ढकांबे शिवार, राष्ट्रीय महामार्ग ८४८, पेठ रोड, गवळीवाडी, गंगापूर रोड, गोवर्धन, त्र्यंबक महामार्ग, बेलगावढगा, नाशिक-मुंबई महामार्ग, विल्होळी, सिन्नर फाटा आणि पुन्हा आडगाव अशा प्रमुख भागांना जोडण्यात येणार आहे. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत होईल. महापालिका अधिकाऱ्यांच्या मते, परिक्रमा मार्ग हा सिंहस्थासाठी उभारण्यात येणाऱ्या प्रमुख पायाभूत सुविधांपैकी एक आहे. जागा हस्तांतरणाला मंजुरी मिळताच प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला अधिक वेग येईल.