हिरवेगार जळगावसाठी
मनपा-ग्रीन सिटीची मोहिम
शहरभर व्यापक वृक्षारोपण होणार
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २३ : वाढते तापमान आणि पर्यावरणीय आव्हानांचा सामना करण्यासाठी महापालिकेने ‘ग्रीन सिटी’ उपक्रमांतर्गत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यासाठी महानगरपालिका आणि ग्रीन सिटी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहराचे तापमान कमी करण्यासाठी तसेच पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी महापौर दीपमाला काळे आणि आयुक्त आदित्य जीवने यांच्या उपस्थितीत झाली.
या बैठकीत २०२६ ते २०३० या कालावधीत जळगाव शहर अधिक हिरवेगार करण्यासाठी व्यापक कृती आराखड्यावर चर्चा करण्यात आली. वाढत्या उष्णतेवर नियंत्रण मिळविण्यासाठी शहरातील विविध भाग, प्रमुख रस्ते तसेच शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला. वृक्षारोपणासोबतच झाडांचे संवर्धन आणि संगोपन यावरही विशेष भर देण्यात येणार आहे. बैठकीस उपायुक्त निर्मला गायकवाड, सहाय्यक आयुक्त संजय राऊत, पर्यावरण विभागाचे अभियंता प्रकाश पाटील तसेच ग्रीन सिटी फाउंडेशनचे विजयकुमार वाणी, डॉ. धनंजय बेंद्रे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. महापौर दीपमाला काळे यांनी यावेळी वृक्षारोपण केवळ औपचारिकता न राहता त्याचे दीर्घकालीन परिणाम दिसून यावेत, यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम केले जाणार असल्याचे सांगितले.