धुळे ः टुडे १ साठी
--
फोटो क्रमांक ः 22370
धुळे ः पावसामुळे छत्रीचा आसरा घेणारे वाहनधारक.
--
तापमानात घट झाल्याने दिलासा
-
खरिपाच्या आशा पल्लवित; पारा ३३ अंशांवर घसरला
-
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २३ : शहरासह जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी (ता. २३) पावसाने ठिकठिकाणी दमदार हजेरी लावल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. उन्हाळ्यात सरासरी ४० ते ४५ अंश सेल्सिअसच्या आसपास असणारे तापमान या पावसामुळे थेट ३३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून असह्य उकाड्याने हैराण झालेल्या धुळेकरांना मोठा दिलासा मिळाला असून, वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
-
मृग नक्षत्राच्या सांगता वेळीच शहरासह जिल्ह्यात सोमवारी पावसाने ठिकठिकाणी दमदार एन्ट्री केली होती. त्यानंतर मंगळवारी सकाळपासूनच पुन्हा आकाश ढगाळले होते. दुपारच्या सुमारास पावसाचे वातावरण अधिक गडद झाले आणि दुपारी पावणेतीनच्या सुमारास पावसाच्या शिडकाव्यास सुरुवात झाली. दुपारी साडेचारच्या सुमारास पावसाचा जोर वाढला. सुमारे १० ते १५ मिनिटे शहरात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. त्यानंतरही अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. सायंकाळपर्यंत आकाश पूर्णपणे ढगाळलेले असल्याने रात्रीही जोरदार पाऊस होण्याची शक्यता कायम होती.
-
ग्रामीण भागातही हजेरी
केवळ धुळे शहरातच नव्हे, तर शिंदखेडा तालुक्यासह जिल्ह्यातील अन्य भागातही पावसाने चांगली हजेरी लावली. मान्सूनच्या या आश्वासक पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खरिपाच्या आशा पल्लवित झाल्या असून, शेतकरी आता पेरणीच्या पूर्वतयारीला लागला आहे.