भर’पूर’ पाऊस पडून भूजल पातळी खालावली

भर’पूर’ पाऊस पडून भूजल पातळी खालावली
Published on
दुप्पट पाऊस, तरी भूजलाची घसरण येवला, निफाड, सुरगाणा व त्र्यंबकेश्वरमध्ये सर्वाधिक घट सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.२३ : गेल्या वर्षी समाधानकारक आणि अनेक भागांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस होऊनही नाशिक जिल्ह्यातील भूजलसाठ्यांवरील ताण कमी झालेला नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे कायम दुष्काळी मानल्या जाणाऱ्या तालुक्यांसह सरासरीच्या तुलनेत दुप्पट पाऊस पडणाऱ्या त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, नाशिक आणि दिंडोरी तालुक्यांमध्येही भूजल पातळी घसरल्याने जलसुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. नाशिक जिल्ह्यात वार्षिक सरासरी ९३३ मिलिमीटर पाऊस पडतो. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि सुरगाणा या तालुक्यांमध्ये यापेक्षा दुप्पट पर्जन्यमान नोंदविले जाते. त्यामुळे या भागांतील नद्या-नाल्यांना पूर येतो आणि येथील पाणी मराठवाड्यापर्यंत पोहोचते. मात्र, मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असल्याने भूजल पुनर्भरण अपेक्षित प्रमाणात होत नसल्याचे चित्र आहे. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने मे महिन्यात जिल्ह्यातील १८५ निरीक्षण विहिरींचे परीक्षण केले. त्यानुसार जिल्ह्याची सरासरी भूजल पातळी ८.३२ मीटरवर पोहोचली असून ती गेल्या पाच वर्षांच्या मे महिन्यातील ७.९४ मीटर सरासरीपेक्षा ०.३८ मीटरने खालावली आहे. यावरून भूजलसाठ्यांवरील दबाव कायम असल्याचे स्पष्ट होत आहे. यंदा येवला तालुक्यात सर्वाधिक ०.६९ मीटरची घट नोंदली गेली आहे. त्यापाठोपाठ निफाडमध्ये ०.५९ मीटर, सुरगाण्यात ०.५८ मीटर, त्र्यंबकेश्वरमध्ये ०.४२ मीटर, दिंडोरीत ०.३७ मीटर आणि नाशिक तालुक्यात ०.३५ मीटरने भूजल पातळी खाली गेली आहे. द्राक्ष, कांदा आणि ऊस उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या निफाड, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर आणि येवला तालुक्यांमध्ये भूजल पातळी सात ते नऊ मीटर खोलीपर्यंत गेली आहे. त्यामुळे शेतीसह भविष्यातील पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर वाहून जाणे, भूजलाचा अवाजवी उपसा, खोल बोअरवेल्सची वाढती संख्या, अस्तरीकरण केलेल्या शेततळ्यांचे प्रमाण, वाढते शहरीकरण आणि जमिनीवरील काँक्रीटीकरण यामुळे भूजल पुनर्भरणाची प्रक्रिया मर्यादित होत आहे. परिणामी, भरपूर पाऊस पडूनही भूजलसाठ्यांमध्ये अपेक्षित वाढ होत नसल्याचे वास्तव समोर येत आहे. तालुकानिहाय भूजल पातळी (मीटरमध्ये) येवला - ८.८५ निफाड - ७.५४ सुरगाणा - ७.१९ त्र्यंबकेश्वर - ५.२४ दिंडोरी -७.६१ नाशिक - ७.२३ पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेतील घट (मीटरमध्ये) येवला - ०.६९ निफाड - ०.५९ सुरगाणा -०.५८ त्र्यंबकेश्वर - ०.४२ दिंडोरी - ०.३७ नाशिक- ०.३५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com