संक्षिप्त
कापूस आवक
खानदेशात अल्प
जळगाव : खानदेशात कापूस दर स्थिर आहेत. परंतु आवक अल्प आहे. जूनमध्ये आवक दरवर्षी कमी होते. यंदा दरात सतत चढउतार सुरू होते. कमाल दर मार्च ते जून या कालावधीत ८२०० रुपये प्रतिक्विंटल, असे होते. सध्या दर स्थिर असले तरी गेले २० ते २२ दिवस कापूस आवक फारशी नाही. कापूस दरात मध्यंतरी किंचीत सुधारणा झाली होती. दर प्रतिक्विंटल ८५०० ते ८६०० रुपये, एवढे झाले होते. पण शेतकऱ्यांकडे अपवाद वगळता कापूस नाही. कापूस पट्टा अससेल्या अमळनेर, पारोळा, धरणगाव, जामनेर, चाळीसगाव आदी भागात कापसाची आवक कमी आहे. जिनींग प्रेसिंग कारखानेदेखील सध्या बंदावस्थेत आहेत. काही शेतकऱ्यांकडे कापूससाठा आहे. परंतु त्याची विक्री पाऊस सुरू असल्याने शेतकरी टाळत आहेत.
--
ठिबकचे अनुदान
तत्काळ द्या
जळगाव : सूक्ष्मसिंचनासाठी शासनाने योजना दिली आहे. परंतु पात्र, लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेतून अनुदानासाठी एक वर्ष ते १४ महिने प्रतीक्षा करावी लागत आहे. ही योजना किचकट व वेळखाऊ बनली आहे. ठिबक, तुषार संचाचे दर वाढले आहेत. शेतकऱ्यांना या योजनेत अनुदानासाठी प्रथम ठिबकची खरेदी करावी लागते. हेक्टरी एक लाख रुपये खर्च येतो. परंतु अनुदान मिळविण्यासाठी वेळखाऊ प्रक्रियेतून जावे लागते. ही प्रक्रिया पूर्ण होवूनही एक वर्ष ते १४ महिने अनुदान येत नाही. शेतकऱ्यांना वारंवार कृषी विभागात जावून अनुदानासाठी चकरा माराव्या लागत असल्याची स्थिती आहे.