धुळे ः टुडे १ साठी
--
नाशिकला एक जुलैपासून
लेखा लिपिक प्रशिक्षण सत्र
-
शिफारस पत्रासाठी गुरूवारपर्यंत मुदत
-
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २३ ः शासनाच्या वित्त विभागामार्फत लेखा व कोषागारे, नाशिक वित्त व लेखा प्रशिक्षण केंद्रातर्फे लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र लेखा लिपिक प्रशिक्षण सत्र क्रमांक १०८ चे ५० दिवसांचे प्रशिक्षण सत्र एक जुलै ते १० सप्टेंबर या कालावधीत होणार असल्याची माहिती नाशिक विभागाचे सहसंचालक बाबूलाल पाटील यांनी दिली.
प्रशिक्षणामध्ये लेखा, वित्त व शासनाच्या विविध संगणक प्रणालींचा समावेश असून त्या विषयीचा निश्चित केलेला तपशिलवार अभ्यासक्रम संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयात माहितीसाठी उपलब्ध आहे. या प्रशिक्षण सत्रासाठी कोणत्याही इच्छुक कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्यात येईल. प्रशिक्षणासाठी संपूर्ण ५० दिवसांच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यास पूर्णवेळ प्रशिक्षणास पाठविणे शक्य नसल्यास विशिष्ट मोड्यूलसाठी प्रवेश घेण्याची अनुमती दिली जाईल. कार्यालय प्रमुखांनी त्यांच्याकडील प्रशिक्षणास इच्छुक असलेल्या लिपिक वर्गीय व नवनियुक्त कर्मचाऱ्यांचे अर्ज व शिफारस पत्र २५ जूनपर्यंत सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, वित्त व लेखा प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र वित्तीय व्यवस्थापन संस्था, केंद्र नाशिक, लेखा कोष भवन, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, नाशिक येथे सादर करावे, असे आवाहन श्री.पाटील यांनी केले आहे.