जळगावातील बाबानगरात
जुन्या वादातून चाकूहल्ला
---
एक जण जखमी; संशयितास अटक
सकाळ वृत्तसेसवा
जळगाव, ता. २३ : मित्रांसोबत गप्पा मारत असलेल्या राहुल जयकुमार खिवलानी यांना शिवीगाळ करून त्यांच्या छातीवर चाकूने वार करण्यात आला. शहरातील बाबानगरमध्ये सोमवारी (ता. २२) रात्री ही घटना घडली. या प्रकरणी दोन संशयितांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, संशयितास अटक करण्यात आली आहे.
राहुल खिवलानी सोमवारी रात्री बाबानगरमध्ये मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते. त्या वेळी तेथे रिक्षातून सुनील नियामत तडवी व सतराज गायकवाड आले. तडवी याने राहुल यांना जुन्या वादातून शिवीगाळ करून कानशिलात लगावली. त्या वेळी त्यांनी प्रतिकार केल्यानंतर सतराज गायकवाड याने राहुल यांना पकडून ठेवले व तडवी याने जिवे मारण्याची धमकी देत चाकूने छातीवर वार केला. घटनास्थळावर प्रत्यक्षदर्शी मित्रांनी हल्लेखोरांच्या तावडीतून सोडवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी जखमीचे मित्र भारत कुकरेजा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात सुनील तडवी व सतराज गायकवाड या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताला पोलिसांनी अटक केली असून, त्याची न्यायालयाने चार दिवस पेालिस कोठडीत रवानगी केली आहे.