NSK26H22377(राजेंद्रकुमार गावित )
---
राजेंद्रकुमार गावित प्रदेश महासचिव
काँग्रेसच्या आदिवासी विभागाची जबाबदारी
नंदुरबार, ता. २३ : अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या आदिवासी विभाग प्रदेश महासचिवपदी देवमोगरा एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार गावित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाचा विचार गाव-पाड्यापर्यंत पोहोचविण्यासाठी गावित यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपविली आहे. राजेंद्रकुमार गावित यांनी महासचिवपदाची धुरा हाती घेताच पक्षाची बांधणी हाती घेतली आहे. नंदुरबार जिल्ह्यात आगामी काळात काँग्रेस पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी त्यांनी कामकाज सुरू केले आहे. आदिवासी भागात पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी राज्यभर फिरणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षासाठी तन-मनाने काम करून येणाऱ्या काळात नंदुरबार जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला बनविण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे गावित यांनी सांगितले. महासचिवपदावर नियुक्ती करून पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर विश्वास दाखविला आहे. या नियुक्तीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तोरणमाळला सर्वोदय शिबिर
७, ८ आणि ९ ऑगस्ट २०२६ तोरणमाळ (ता. धडगाव) येथे सर्वोदय संकल्प शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. एकजूट आणि मजबूत भारतासाठी संघटन बांधणीवर काँग्रेस पक्षाने लक्ष केंद्रित केले आहे. असमानता आणि वंचितांचे शोषण थांबावे, यासाठी शिबिरात विशेष मंथन केले जाणार आहे. सध्याचा काळ हा देशासाठी कठीण काळ असला तरी काँग्रेस पक्ष देशाचा सुवर्णकाळ हमखास आणेल, यावर काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा विश्वास आहे. यासाठीच काँग्रेस पक्षाने राष्ट्र निर्माणाचे अखिल भारतीय अभियान हाती घेतले आहे. तोरणमाळ येथे होणाऱ्या शिबिराच्या निमित्ताने कार्यकर्त्यांचा संगम पाहायला मिळणार असून, संघटन बांधणीसाठी तज्ज्ञ मार्गदर्शक उपस्थित राहणार आहेत.