फोटो : H22385
नाशिक : श्री टेंबलाई माता मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याप्रसंगी उपस्थित मान्यवर.
----------------
श्री टेंबलाई माता मंदिरात
प्राणप्रतिष्ठा, जीर्णोद्धार सोहळा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २४ : द्वारका येथील श्री टेंबलाई माता (त्र्यंबोली देवी) मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व १२५ वर्षे पुरातन मंदिराच्या जीर्णोद्धाराचा धार्मिक सोहळा पार पडला. भक्तिमय, उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात भाविक उपस्थित होते.
तीन दिवसीय धार्मिक महोत्सवात परिसरातील भाविकांनी उपस्थित राहून दर्शन, धार्मिक विधींचा लाभ घेतला. सोहळ्याच्या पहिल्या दिवशी शोभायात्रा व मिरवणूक काढली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि जयघोषात निघालेल्या या शोभायात्रेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. डोक्यावर कळस घेऊन आलेल्या महिलांचा सहभाग लक्षणीय होता.
दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी गणपती पूजन, पुण्याहवाचन, मंडळ स्थापना, देवता हवन, विविध धार्मिक संस्कार व वैदिक मंत्रोच्चारात पूजन विधी पार पडले. त्यानंतर महंत पंचमुखी हनुमान मंदिराचे व दिगंबर आखाड्याचे कुंभमेळ्याचे मुख्य प्रवक्ते भक्ती चरणदास महाराज यांच्या हस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा विधिवत झाला. श्रीराम शक्ती पिठाचे सिद्धेश्वरानंद महाराज, श्रीनाथ महाराज, विलास पांगारकर, रामसिंग बावरी आदी उपस्थित होते. धार्मिक कार्यक्रमांच्या समारोपानंतर महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला. हा सोहळा हिंदू एकता आंदोलन पक्ष प्रणीत शहीद भगतसिंग क्रांतिदल मंडळ ट्रस्ट, अखिल महाराष्ट्र कातारी शिकलकर समाज संघ व श्री टेंबलाई माता भक्त मंडळ यांच्यामार्फत आयोजित केला होता.