ॲंकर शहर-जिल्हा (कॉमन) टुडे तीनसाठी
-------
NSK26H22390
कानळदा (ता.जळगाव) : एकल महिलांचा सत्कार करताना खासदार स्मिता वाघ. शेजारी सरपंच पुंडलिक सपकाळे आदी.
-------
‘एकल’ महिलांच्या सत्काराने डोळ्यांत आनंदाश्रू
---
कानळदा ग्रामपंचायतीचा संवेदनशील उपक्रम ठरला जिल्ह्यासाठी आदर्श
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २४ : समाजातील एकल महिलांना सन्मान, आत्मविश्वास व सामाजिक आधार मिळावा, यासाठी तालुक्यातील कानळदा ग्रामपंचायतीने आयोजित केलेला एकल महिला मेळावा व कार्यशाळा हा केवळ एक शासकीय कार्यक्रम न ठरता अनेक महिलांच्या आयुष्यात नवसंजीवनी देणारा, त्यांच्या मनातील एकाकीपणावर फुंकर घालणारा ठरला. एकल महिलादिनानिमित्त ग्रामपंचायतींना वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम घेण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले होते. त्यानुसार कानळदा येथे बुधवारी (ता.२४) हा कार्यक्रम झाला. खासदार स्मिता वाघ व मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर प्रमुख पाहुण्या होत्या.
सामाजिक नाती जपा
खासदार वाघ म्हणाल्या की, मी स्वतःही एकल महिला आहे. माझे पती कोणत्याही आजाराशिवाय अचानक आपल्यातून निघून गेले. त्या कठीण प्रसंगानंतरही मी आत्मविश्वास गमावला नाही. संघर्ष करीत आज तुमच्यासमोर खासदार म्हणून उभी आहे. त्यामुळे तुम्हीही स्वतःला कधीही एकटे समजू नका. जिद्दीने आयुष्याला सामोरे जा, अनेकदा नात्यांपेक्षा शेजारी अधिक मदतीला धावून येतात. त्यामुळे सामाजिक नाती जपा.
सीईओ नायर म्हणाल्या की, एकल महिलांनी बचतगटांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे. मालमत्तेच्या नमुना क्रमांक आठमध्ये व शेतीच्या सातबारा उताऱ्यावर स्वतःचे नाव नोंदविण्यासाठी पुढाकार घ्यावा. तुम्ही एकट्या नाहीत, प्रशासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. उपस्थित महिला पाहून कानळदा गावाचे विशेषत: महिलांचे भरभरून कौतुक केले.
सरपंच पुंडलिक सपकाळे म्हणाले की, कानळदा गावातील कोणत्याही एकल महिलेला रूढी-परंपरांच्या नावाखाली अपमानास्पद वागणूक दिली जाणार नाही. प्रत्येक शुभकार्यात त्यांना सन्मानाने स्थान दिले जाईल. ग्रामपंचायतस्तरावर एकल महिलांची स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येईल. त्यांच्या समस्या, अडचणी व विविध प्रश्न सोडविण्यासाठी दर महिन्याला नियमित बैठक हेाईल. यावेळी गावातील एकूण ५३५ एकल महिलांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते झाला.
अनेकांच्या भावना अनावर
सन्मानपत्र स्वीकारताना अनेक महिलांच्या भावना अनावर झाल्या. खासदार वाघ यांनी महिलांच्या खांद्यावर मायेचा हात ठेवून त्यांना धीर दिला. त्याक्षणी अनेक महिलांचे डोळे पाणावले व सभागृहात एक भावनिक वातावरण निर्माण झाले. आयुष्यात प्रथमच समाजाने इतक्या सन्मानाने आपला गौरव केल्याची भावना अनेक महिलांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होती.
जळगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, सहायक गटविकास अधिकारी सरला पाटील, महिला व बालविकास अधिकारी संपदा संत, आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे, विस्तार अधिकारी (पंचायत) सुनील बोरसे यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. सरपंच सपकाळे, सदस्य भिकन सपकाळे, अनिल सपकाळे, दिनेश सपकाळे, गुलाब सैंदाणे, तुषार विसपुते, ग्रामपंचायत अधिकारी रघुनाथ चव्हाण आदींनी सहकार्य केले. सूत्रसंचालन चंद्रकांत सपकाळे यांनी केले.