जल्लोषाच्या गर्दीत चोरटे सक्रिय
चौघांच्या सोनसाखळ्यांवर डल्ला
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २४ : विधान परिषद निवडणुकीचा सोमवारी (ता. २२) निकाल होता. त्या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जमलेल्या समर्थकांच्या गर्दीत चोरट्यांनीही हजेरी लावत समर्थक गुलालाची उधळण करीत असताना चोरट्यांनी चौघांच्या गळ्यातील सुमारे १२ लाखांच्या चार सोन्याच्या चैन हातोहात लंपास करीत ‘हातसफाई’ दाखविली. या घटना जिल्हाधिकारी कार्यालय व म्हसरुळ येथील निसर्गनगर परिसरातील नवनिर्वाचित आमदार गोकुळ गिते यांच्या निवासस्थानाबाहेर घडल्या आहेत. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात दोन तर म्हसरुळ पोलिसात एक असे एकूण तीन गुन्हे दाखल झाले आहेत.
गंगापूर रोड येथील रहिवासी अथर्व भालचंद दरगोडे (२०) याच्या फिर्यादीनुसार, सोमवारी (ता.२२) सकाळी साडेदहाच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर विधान परिषद मतमोजणीप्रसंगी गेला असता, त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची गर्दी होती. या गर्दीत साडेअकराच्या सुमारास अथर्वच्या लक्षात आले की त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन गायब आहे. त्याने परिसरात शोध घेतला, परंतु चैन मिळून आली नाही. गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने अडीच लाखांची सोन्याची चैन चोरल्याची खात्री पटल्यानंतर त्याने सरकारवाडा पोलिसात धाव घेतली. तर, दुसरी घटना मखमलाबादचे रहिवासी ६० वर्षीय निवृत्त लालजी दत्तु आवारे हे मित्रांसह जिल्हाधिकारी गेटसमोर थांबले होते. सकाळी अकरा ते बाराच्या दरम्यान गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील अडीच लाखांच्या सोन्याच्या साखळीवर डल्ला मारला. सरकारवाडा पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलीस चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. तर, निकालानंतर म्हसरुळ येथील निसर्गनगर परिसरात गोकुळ गिते यांच्या निवासस्थानाबाहेरही समर्थकांचा जल्लोष सुरु होता. दुपारी दोनच्या सुमारास शुभम अशोक पाटील (३०, रा. येवला), मनोज उत्तमराव दिघे यांच्या गळ्यातील ६ लाख ९५ हजार रुपयांच्या दोन सोन्याची चैन चोरट्यांनी लंपास केल्या. याप्रकरणी शुभम यांच्या फिर्यादीनुसार, म्हसरुळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.