भोंदू अशोक खरातविरोधातील
आणखी दोन दोषारोपपत्रे दाखल
१७ पैकी १२ गुन्ह्यांचा एसआयटीकडून तपास
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २४ : महिला भाविकांचे लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक, खंडणी आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांप्रकरणी भोंदू अशोक खरात याच्याविरोधातील आणखी दोन गुन्ह्यांचे दोषारोपपत्र सरकारवाडा पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) न्यायालयात सादर केले आहे. या दोन्ही प्रकरणांची सुनावणी ७ जुलैला होणार आहे.
दैवी शक्ती असल्याचा आभास निर्माण करून महिला भाविकांवर अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या खरातविरोधात नाशिक शहर, नाशिक ग्रामीण तसेच अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण १७ गुन्हे दाखल आहेत. त्यांपैकी १२ गुन्ह्यांचा तपास एसआयटीकडून सुरू आहे. महिलांवरील लैंगिक अत्याचाराशी संबंधित आठ गुन्ह्यांची दोषारोपपत्रे यापूर्वीच न्यायालयात दाखल करण्यात आली आहेत.
नुकत्याच दाखल करण्यात आलेल्या दोन गुन्ह्यांच्या सुनावणीवेळी खरातला न्यायालयात हजर करण्यात आले नव्हते. मात्र तपास पथकाने या प्रकरणांतील दोषारोपपत्रे सादर केली असून, त्यावर ७ जुलैला सुनावणी होणार आहे.
दरम्यान, गेल्या साडेतीन महिन्यांपासून खरात न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्याविरोधातील निम्म्याहून अधिक गुन्ह्यांची दोषारोपपत्रे अद्याप दाखल झालेली नाहीत. तसेच या प्रकरणातील सहआरोपी व खरातची पत्नी कल्पना खरात ही अद्याप फरारी असून, तिचा अटकपूर्व जामीन अर्ज छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे तिच्या अटकेसाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.