फोटो : २२४११
----------------
रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचे आंदोलन स्थगित
शनिवारी उच्चस्तरीय बैठक, तोडगा न निघाल्यास मंगळवारी आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २४ : नाशिक तालुक्यातील रिंग रोड प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी मुंबईतील ''वर्षा'' निवासस्थानासमोर जाहीर केलेले आंदोलन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या आश्वासनानंतर मंगळवार (ता. ३०) पर्यंत स्थगित करण्यात आले आहे. शनिवारी (ता. २७) होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीत ठोस निर्णय न झाल्यास शेतकरी आक्रमक आंदोलन करतील, असा इशारा छावा क्रांतिवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर यांनी दिला आहे.
मुंबई नाका येथील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन करून आंदोलनाची औपचारिक सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मंत्री महाजन यांचे स्वीय सहाय्यक संदीप जाधव व उपायुक्त काळे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. थेट फोनवरून झालेल्या संवादात महाजन यांनी शनिवारी संबंधित मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, एमएसआरडीसी, नगररचना व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्याचे आश्वासन दिले. बैठकीत मातोरी, मुंगसरे, जलालपूर, महादेवपूर, गोवर्धन, चांदशी या गावांतील चुकीचे अलाइनमेंट बदलून गवळवाडी मार्गे मार्ग निश्चित करण्याची मागणी, बाजारभावानुसार मोबदला, जिरायत जमिनींचे फेरसर्वेक्षण करून बागायती नोंद, भूसंपादनासाठी गुणांक दोन लागू करणे आदी मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. तोपर्यंत कोणत्याही बाधित शेतकऱ्याला नवीन नोटीस किंवा जमीन खरेदीसाठी बोलावले जाणार नसल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले.