गुन्हे वृत्त
--
घरात घुसून
सामानाची तोडफोड
नाशिक : आनंदवल्ली येथे घरात बळजबरीने घुसून संशयितांनी दमदाटी, शिवीगाळ करीत धारदार हत्यारांनी घरातील टीव्ही, कपाट फोडत दहशत माजविली. याप्रकरणी रेखा शिंदे (रा. आनंदवली) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित सुमीत बगाटे, वैभव बगाटे व त्यांचा एक साथीदार यांनी सोमवारी (ता. २२) सायंकाळी सहाच्या सुमारास बळजबरीने घरात शिरले. त्यांनी रेखा यांचा मुलगा आदित्य उर्फ शहेनशहा कुठे आहे, असे विचारपूस करीत शिवीगाळ केली. तसेच, आदित्यला जीवे मारू असे धमकावत घरातील टीव्ही, कपाट फोडून दहशत केली. त्यानंतर तिघे पसार झाले. याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---
एबीबी सर्कल
परिसरात घरफोडी
नाशिक : एबीबी सर्कल परिसरात चोरट्यांनी बंद बंगल्याचा कडीकोयंडा तोडून ५ लाख ७६ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेत घरफोडी केली. याप्रकरणी विवेक गोविंद राय (५९, रा. राधानगरी, विकास कॉलनी) यांच्या फिर्यादीनुसार, ते १७ ते २१ जूनदरम्यान इंदूरला गेले असता, या दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद बंगल्याचे लॉक तोडून घरफोडी करीत मौल्यवान ऐवज चोरून नेला. याप्रकरणी गंगापूर पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
--
तारवालानगरला
दुचाकीची चोरी
नाशिक : तारवालानगर परिसरातील हॉस्पिटलसमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी दिलीप पांडुरुंग गांगुर्डे (रा. पंचवटी) यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली आहे. गांगुर्डे यांच्या फिर्यादीनुसार, २९ मेस दुपारी तीनच्या सुमारास त्यांचा भाचा विशाल जाधव हा दुचाकीवरून (एमएच- १५- केजी- ५६४४) जात होता. दुचाकी घसरून अपघात झाल्याने विशालने दुचाकी रस्त्याच्या कडेला लावली आणि जवळच असलेल्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेला. तेथून परतल्यानंतर त्यास दुचाकी आढळून आली नाही. त्यामुळे त्यांनी दुचाकीची शोधाशोध करून सापडली नाही. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.