फोटो : H22413
------------
गोल्फ क्लबवर हायड्रोलिक शिडीचे प्रात्यक्षिके
पुढील आठवड्यात अग्निशमन दलाच्या सेवेत
नाशिक, ता. २४ : शहरात वाढणाऱ्या गगनचुंबी इमारतींच्या पार्श्वभूमीवर, नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागाने ९० मीटर उंचीची हायड्रोलिक शिडी फिनलॅण्डच्या ‘ब्रान्टो स्कायलिफ्ट’ कंपनीकडून खरेदी केली आहे. राज्याच्या एकीकृत विकास नियंत्रण नियमावलीनुसार ७० मीटरपेक्षा उंच इमारतींना परवानगी मिळत असल्याने, भविष्यातील अग्निसुरक्षेच्या दृष्टीने ही शिडी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. सध्या गोल्फ क्लब मैदानावर या शिडीची प्रात्यक्षिके (ट्रायल) सुरू असून, मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी स्वतः यावर देखरेख करत आहेत.
आरटीओ कर्मचाऱ्यांच्या संपामुळे या वाहनाचे पासिंग रखडले होते. आता हा संप मिटल्याने पुढील आठवड्यात सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून ही शिडी प्रत्यक्ष अग्निशमन दलाच्या सेवेत दाखल होईल. शहराच्या मध्यवर्ती भागात उभ्या राहणाऱ्या उंच इमारतींमध्ये आग लागल्यास वरच्या मजल्यांपर्यंत पोहोचणे कठीण होते; मात्र या शिडीमुळे आता ९० मीटरपर्यंतच्या इमारतींमध्ये बचाव व अग्निशमन कार्य अधिक सुलभ आणि गतिमान होणार आहे, अशी माहिती श्री. बैरागी यांनी दिली. या शिडीची खरेदी प्रक्रिया २०१८ मध्ये सुरू झाली होती. सुरुवातीला ज्या कंपनीला हे काम दिले होते ती दिवाळखोरीत गेल्याने, अखेर फिनलॅण्डच्या ‘ब्रान्टो स्कायलिफ्ट’ कंपनीला हे नवीन कंत्राट देण्यात आले. ही युरोपियन कंपनी असल्याने संपूर्ण व्यवहार युरो चलनात झाला असून, महापालिकेच्या अग्निशमन निधीतून तब्बल ३३ कोटी रुपये तारण ठेवून ही खरेदी पूर्ण करण्यात आली आहे.