सेकंडमेन
NSK26H22418
जळगाव : चोरट्यांनी गॅस कटरने कापलेल्या एटीएम मशीनच्या याच कॅश बॉक्समधील रक्कम जळाली.
---------
एटीएम मशीन कापताना नोटा जळाल्या
----
जळगावातील घटना; पोलिस वाहनांच्या आवाजाने चोरटे फरार
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २४ : जळगाव-अजिंठा महामार्गावरील जळगाव तोलकाटा शेजारील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीन गॅस कटरने कापून चोरीचा प्रयत्न झाला. यात अर्धवट ‘एटीएम’ मशीन कापताना आतील कॅश बॉक्समधील १,१०० रुपयांच्या नोटा जळाल्या. ही घटना मंगळवारी (ता.२३) पहाटे उघडकीस आली.
जळगावच्या अजिंठा मार्गावरील सुप्रिम कॉलनी जवळील जळगाव तोलकाटा शेजारी स्टेट बँकेचे एटीएम आहे. मंगळवारी पहाटे ४ वाजून ३२ मिनिटांच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या ‘सेल्टॉस’ कारमधून तोंडाला रुमाल बांधलेले दोन चोरटे तेथे आले. त्यांनी एटीएमच्या रूममध्ये छोटे गॅस सिलिंडर व ऑक्सिजन सिलिंडर नेले. गॅस कटरच्या मदतीने एटीएमचा कॅश ट्रे कापण्याचा प्रयत्न सुरू केला.
सेन्सरद्वारे मुख्यालयास कळाले
एटीएम मशीनशी छेडखानी होत असतानाच एटीएम यंत्रातील सेन्सर प्रणालीमुळे चेन्नई येथील मुख्य कार्यालयाला (अलर्ट सिस्टीमद्वारे) याची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने एमआयडीसी पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली. पोलिस वाहनाचा आवाज ऐकताच चोरट्यांनी तेथून पळ काढला. चोरटे घाईघाईत आपले गॅस सिलिंडर व इतर साहित्य एटीएम रुममध्येच सोडून पसार झालेत. कॅश ट्रेमधील ५०० रुपयांच्या २ व शंभर रुपयांची १ अशा ३ नोटा जळाल्या.
दुसऱ्यांदा प्रयत्न
याच एटीएममध्ये तीन महिन्यांपूर्वीही चोरीचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे या एटीएमवर चोरट्यांची पुन्हा नजर असल्याचे दिसून येत आहे. या स्टेट बँकेच्या एटीएम मशीनची देखभाल व दुरुस्ती ‘हिताची पेमेंट प्रा. लि.’ (चेन्नई) या कंपनीकडे आहे. घटनेची माहिती मिळताच कंपनीचे नाशिक येथील प्रतिनिधी वाल्मीक पाटील जळगावात दाखल झालेत. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेज व कारच्या क्रमांकाच्या आधारे पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे.