धुळे : टुडे पान ३ साठी..अँकर
--
फोटो क्रमांक : 22414 - लोगो
--
हस्ती बँकेत ‘आवास योजना २.०’चा शुभारंभ
--
सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न होणार साकार; योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २४ : सर्वसामान्य नागरिकांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी दोंडाईचा येथील हस्ती बँक सरसावली आहे. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.०’ ची अंमलबजावणी बँकेने अधिकृतपणे सुरू केली असून, बँकेच्या सर्व २३ शाखांमधून या योजनेचा लाभ नागरिकांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हस्ती बँकेने ‘नॅशनल हाऊसिंग बँक’ सोबत विशेष सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे पात्र नागरिकांना शासनाच्या गृहअनुदानाचा (सबसिडी) लाभ मिळवून देण्यासाठी बँक आता पूर्णपणे सज्ज झाली आहे.
ही योजना प्रामुख्याने शहरी भागासाठी लागू असून, नगरपालिका व टाऊन प्लॅनिंग क्षेत्रातील पात्र घरांसाठी शासनाच्या अटींनुसार एक लाख ८० हजार रुपयांपर्यंतची सबसिडी पाच टप्प्यांत वितरित केली जाणार आहे. या योजनेसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी वार्षिक उत्पन्न तीन लाखांपर्यंत, अल्प उत्पन्न गटासाठी तीन लाख ते सहा लाख आणि मध्यम उत्पन्न गटासाठी सहा लाख ते नऊ लाखांपर्यंत उत्पन्नाची अट आहे. तसेच, घराचे क्षेत्रफळ १२० चौरस मीटरच्या आत असणे आवश्यक असून, गृहकर्जाची रक्कम २५ लाखांपेक्षा जास्त नसावी आणि घराचे एकूण मूल्यांकन किंमत ३५ लाखांपर्यंत असावी, अशी अट या योजनेसाठी लागू आहे. या संधीचा सर्व पात्र ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेतर्फे करण्यात आले आहे. या योजनेसाठी बँकेचे सीईओ सतीश जैन, बँकिंग तज्ज्ञ प्रकाश कुचेरिया, किशोर चौधरी, नरेंद्र पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.
-
कोट
प्रधानमंत्री आवास योजना १.० अंतर्गत हस्ती बँकेने २३१ लाभार्थ्यांना चार कोटी ४५ लाखांची सबसिडी यशस्वीरीत्या मिळवून दिली आहे. योजनेच्या अंमलबजावणीचा दांडगा अनुभव बँकेला आहे. आता ‘आवास योजना २.०’ द्वारे अधिकाधिक पात्र कुटुंबांना एक लाख ८० लाखांपर्यंतच्या अनुदानाचा लाभ मिळवून देण्यासाठी बँक कटिबद्ध आहे. सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल.
- कैलास जैन, अध्यक्ष, हस्ती बँक, दोंडाईचा