रिक्षाच्या पुढील सीटवर
विद्यार्थी बसविल्यास कारवाई
नंदुरबार, ता. २४ : शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतूक करताना पुढील सीटवर चालकाच्या डाव्या, उजव्या बाजूला विद्यार्थी बसविल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी जगदीश गावित यांनी दिला आहे.
जगदीश गावित यांनी सांगितले, की शहरातील व परिसरातील रिक्षाचालक शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतूक करीत असतात. वाहतूक करताना सुरक्षेच्या कारणास्तव कोणत्याही विद्यार्थ्याला रिक्षाच्या पुढील सीटवर चालकाच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला बसवू नये. पुढील सीटवर विद्यार्थी बसवणे हे मोटार वाहन कायद्याचे गंभीर उल्लंघन आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पुढील सीटवर विद्यार्थी बसवून वाहतूक करताना आढळून आल्यास कठोर कारवाई केली जाईल. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्व रिक्षाचालकांनी या सूचनेचे काटेकोरपणे पालन करावे. जे या नियमाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर शहर वाहतूक शाखेतर्फे मोटार वाहन कायद्यांतर्गत कडक दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येईल. विद्यार्थ्यांची सुरक्षा हीच आपली प्राथमिकता असल्याने प्रशासनाला सहकार्य करून दंडात्मक कारवाई टाळावी, असेही जगदीश गावित यांनी म्हटले आहे.