धुळे : टुडे पान ३ साठी..
--
फोटो क्रमांक : 22423
साक्री : प्रचिती स्कूलमध्ये योग दिनी विद्यार्थ्याना योगासने करून दाखवत मार्गदर्शन करताना योगगुरु योगिनाथ दिनानाथ महाराज.
--
योग हाच निरोगी जीवनाचा राजमार्ग
--
योगिनाथ दिनानाथ महाराज : प्रचिती स्कूलमध्ये योग दिन
सकाळ वृत्तसेवा
साक्री, ता. २४ : योग ही केवळ शारीरिक कसरत नसून ते निरोगी शरीर, शांत मन आणि सकारात्मक विचारांचा संगम साधणारे उत्तम जीवन जगण्याचे शास्त्र आहे. योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी असून, नियमित योगाभ्यासाने शरीर व मन सुदृढ ठेवावे. योग हाच निरोगी जीवनाचा राजमार्ग असल्याचे प्रतिपादन महंत व योगगुरु योगिनाथ दिनानाथ महाराज यांनी केले. साक्री येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या कावठे, पिंपळनेर, साक्री आणि कासारे या सर्व शाखांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला, त्याप्रसंगी ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानसाधना करून आरोग्याचा संकल्प सोडला. योगगुरु योगिनाथ महाराजांनी विद्यार्थ्यांना योगाचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक महत्त्व समजावून सांगितले. ते म्हणाले, की जीवनात मोठे यश मिळवण्यासाठी केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसते, तर त्यासोबत चांगले संस्कार, नम्रता, शिस्त आणि माणुसकीची जोड असणे आवश्यक आहे. राग, मत्सर आणि नकारात्मक विचार बाजूला ठेवून स्वतःमधील चांगुलपणा जागृत करणे म्हणजेच खरे अध्यात्म होय. आई-वडिलांचा आदर आणि सेवाभावातूनच उत्तम व्यक्तिमत्त्व घडते, असा संदेश त्यांनी दिला. याप्रसंगी प्रचिती इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांनीही विद्यार्थ्यांना संबोधित केले. ते म्हणाले, की निरोगी शरीर, शांत मन आणि सुंदर विचार यांचा संगम म्हणजे योग होय. विद्यार्थ्यांनी दररोज योगासने करावीत. आधुनिक शिक्षणासोबतच भारतीय संस्कृती व नैतिक मूल्यांची जपणूक करून विद्यार्थ्यांना सुजाण नागरिक घडविण्याचा प्रयत्न शाळा सातत्याने करत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. शाळेचे मुख्याध्यापक, समन्वयक, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.