पदवीधर अंशकालीन शासकीय
कर्मचाऱ्यांची उद्या बैठक
नंदुरबार, ता. २४ : निवृत्त झालेले पदवीधर, अंशकालीन शासकीय कर्मचारी जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांत कार्यरत आहेत. अशा कर्मचाऱ्यांची जिल्हा बैठक शुक्रवारी (ता. २६) सकाळी अकराला नंदुरबार येथील पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयात सरळ सेवेने शासकीय सेवेत रुजू झालेल्या अंशकालीन शासकीय कर्मचाऱ्यांना २००५ पूर्वी तीन वर्षांची सेवा पूर्वलक्षीप्रमाणे अंतर्भूत करून जुनी पेन्शन योजना लागू करावी. आंध्र प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर विशेष बाब म्हणून निवृत्तीचे वय ६२ करावे, अशी मागणी राज्य शासनास केली होती; परंतु राज्य शासनाकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे पदवीधर अंशकालीन शासकीय कर्मचारी जुनी पेन्शन हक्क समितीचे राज्याध्यक्ष लातीफ पठाण यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर २४ एप्रिल २००६ ला न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत १२ आठवड्यांत संघटनेच्या मागण्यांवर निर्णय घेण्याचा आदेश राज्य शासनास दिलेला आहे. यासंबंधी मंत्रालयीन स्तरावर सुरू असलेल्या हालचाली व न्यायालयीन निकालाबाबत माहिती देण्यासाठी जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पदवीधर अंशकालीन शासकीय कार्यरत व निवृत्त कर्मचारी यांनी शुक्रवारी बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन पदवीधर अंशकालीन शासकीय कर्मचारी जुनी पेन्शन हक्क समितीचे जिल्हाध्यक्ष प्रीतम साळवे, जिल्हा कार्याध्यक्ष जयेंद्र अहिरे, सरचिटणीस राजेश मोहिते, प्रसिद्धीप्रमुख प्रदीप गरुड यांनी केले आहे.