मेन
पहिल्याच पावसात शहराचे तळे
चिखल, धुळीने नागरिक त्रस्त; अनेक ठिकाणी रस्ते खचले
सकाह वृत्तसेवा
नाशिक, ता. २४ : शहरासह उपनगरी भागांमध्ये रस्ते बांधणीची कामे सुरू असून, यामुळे पहिल्या पावसातच शहराचे तळे झाले. सर्वत्र चिखल, धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक ठिकाणी रस्ते खचल्याने पावसाचे पाणी साठून असल्याची दृश्य बुधवारी (ता. २५) बघायला मिळाले. संपूर्ण पावसाळा जाणार कसा? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
मोठ्या प्रतीक्षेनंतर मंगळवारी (ता. २३) शहरभर पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र त्यापेक्षाही पाऊस अधिक चिंता वाढविणारा ठरला आहे. दिंडोरी रोडवरील भररस्त्यावर पाणी साचल्याने चारचाकी वाहन पाण्यात अडकले होते. भाभानगर, काठे गल्ली सिग्नल ते मुंबई नाका या दरम्यानही चिख्खल झाल्याने गाड्या घसरण्याचे प्रमाण वाढले होते. इतर विविध सर्कल, चौकांमध्ये पाणी साचल्याचे दृश्य बघायला मिळाले. पहिल्याच पावसात शहराचे तळे झाल्याने, संपूर्ण पावसाळ्यात शहराचे समुद्रात रूपांतर होते की काय? अशी मिश्कील टिपणी नागरिकांकडून केली जाते आहे. दरम्यान बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण असले तरी पावसाने विश्रांती घेतली होती. यामुळे पहिल्या पावसात झालेल्या चिखलातील धुलीकण हवेत मिसळले होते. यामुळे दुचाकीस्वारांना वाहन चालविताना आव्हानांचा सामना करावा लागत होता. अनेक ठिकाणी रस्ते खचले असल्याने अपघाताच्या संख्येतही वाढ झाली आहे.
-----चौकट
बॅरेकेटिंगची मागणी..
खड्डे, काम सुरु असलेल्या रस्त्यांच्या ठिकाणी बॅरेकेटिंग करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते आहे. ठेकेदाराला यासंदर्भात सूचना दिले असल्याचा दावा महापालिका प्रशासनातर्फे केला जात असला तरी प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच असल्याची वस्तुस्थिती आहे.
-------