ढगाळ वातावरणाने दिला गारव्याचा दिलासा
कळवण तालुक्यात तीन शेळ्या, बोकडाचा मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २४ : शहरासह जिल्ह्यात बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्याने उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. मात्र, आकाशात ढगांची गर्दी असूनही बहुतांश भागांत पावसाने हजेरी लावली नाही. काही ठिकाणी तुरळक रिमझिम सरी बरसल्या, तर जिल्ह्याचा मोठा भाग कोरडाच राहिला.
दरम्यान, सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात पशुहानीची घटना घडली. कळवण तालुक्यातील मौजे साजा नरूळ येथे शेतातील विजेच्या तारेचा धक्का लागून रामदास ठाकरे यांच्या मालकीच्या तीन शेळ्या आणि एका बोकडाचा मृत्यू झाला. या घटनेचा पंचनामा करण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. यापूर्वीही गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यातील विविध भागांत वीज पडून गायींचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या.
बुधवारी सकाळपासूनच शहर व उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. काही भागांत अल्प प्रमाणात पाऊस झाला असला, तरी दिवसभर जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम राहिली. जिल्ह्यातील काही ठिकाणीच रिमझिम सरींची नोंद झाली, तर उर्वरित भागांत पावसाने विश्रांती घेतली.
कमाल तापमान तिशीच्या आत
एप्रिलपासून सातत्याने चढत्या आलेखावर असलेले नाशिकचे तापमान आता घटू लागले आहे. गेल्या काही महिन्यांत कमाल तापमान ३५ ते ४२ अंश सेल्सिअसदरम्यान नोंदविले जात होते. जून महिन्यातही पावसाने दडी मारल्याने उष्णतेचा तडाखा कायम होता. मात्र, हंगामातील पहिल्या पावसानंतर तापमानात लक्षणीय घट झाली आहे.
बुधवारी शहराचे कमाल तापमान २८.३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. आगामी दिवसांत पावसाची स्थिती कायम राहिल्यास तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.