NSK26H22449
जळगाव : घनकचरा प्रकल्प येथे सुरू झालेला वजन काटा.
.........
घनकचरा प्रकल्वावरील बंद
वजन काटा पुन्हा कार्यान्वित
-----
उपमहापौरांच्या पाठपुराव्याला यश; सीसीटीव्हीद्वारे होणार थेट देखरेख
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २४ : महापालिकेच्या कचरा प्रकल्पावरील बंदावस्थेतील वजन काटा अखेर दुरुस्त करून कार्यान्वित करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा काटा वापराविना पडून असल्याने कचऱ्याचे वजन करण्यासाठी खासगी वजन काट्यांचा वापर केला जात होता. याबाबत उपमहापौर मनोज चौधरी यांनी महासभेत वारंवार पाठपुरावा करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
महापालिकेच्या मालकीचा वजन काटा उपलब्ध असतानाही त्याच्या दुरुस्तीअभावी खासगी यंत्रणेवर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे महापालिकेवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचा मुद्दा उपमहापौरांनी उपस्थित केला होता. त्यानंतर प्रशासनाने आवश्यक दुरुस्ती करून वजन काट्याची चाचणी पूर्ण केली असून, तो नियमित वापरासाठी सुरू करण्यात आला आहे. कचरा व्यवस्थापनप्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी वजन काटा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. या कॅमेऱ्यांचे थेट निरीक्षण करण्याची सुविधा उपमहापौरांच्या दालनात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे कचऱ्याच्या वजनासंदर्भातील नोंदी व व्यवहारांवर प्रभावी नियंत्रण ठेवता येणार आहे.
दुसराही काटा सुरू करा
शहरातील टीबी हाऊस परिसरात असलेला दुसरा वजन काटाही लवकरात लवकर दुरुस्त करून सुरू करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. कचरा वजन प्रक्रियेची पाहणी व व्यवस्थेचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. भविष्यात या प्रणालीमुळे आर्थिक बचत व अधिक कार्यक्षम कचरा व्यवस्थापन साध्य होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.