निवासी अतिक्रमित घरे नियमित करा
नागरिकांची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. २५ : शहरातील माळीवाडा परिसरातील शासकीय जागेवरील २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमित करून माळीवाड्याचा सर्वांगीण विकास करावा, अशी मागणी करणारे जिल्हाधिकारी मिताली सेठी यांच्याकडे करण्यात आली आहे. मागणीमुळे खळजागेतील १५० कुटुंबांच्या वास्तव्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
नंदुरबार येथील शासकीय खळवाड जागेवर वास्तव्यास असलेल्या रहिवासी यांनी या जागेवरील निवासी वस्तीचे विशेष बाब म्हणून नियमितीकरण करण्यात यावे, सदर जागा खळवाड म्हणून ओळखली जाते. या परिसरात आमच्या पूर्वजांकडून शेकडो वर्षांपासून शेतीमाल काढणी, धान्य साठवणुक, जनावरांची देखभाल व खळवाडाशी संबंधित कामे केली आहेत. त्यामुळे या भागास शासन दप्तरी खळवाड हे नांव प्राप्त झाले आहे. याठिकाणी पूर्वीपासूनच अनेक कुटूंबाची कुडामातीची घरे व झोपड्या अस्तित्वात होत्या. कालांतराने मागील १० ते १५ वर्षांत संबंधित रहिवाशांनी आपल्या आर्थिक क्षमतेनुसार हळुहळु पक्की घरे बांधली आहेत. सद्यस्थितीत या परिसरात सुमारे १०० ते १५० कुटुंबे वास्तव्यास आहेत. या वस्तीस मागील अनेक वर्षांपासून नगरपालिका प्रशासनामार्फत रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेज, स्ट्रिट लाईट, स्वच्छता व कचरा संकलन यांसारख्या मुलभुत नागरी सुविधा पुरविण्यात येत आहेत. तसेच अनेक घरांवर मालमत्ता कर व इतर करांची आकारणी करण्यात आलेली आहे.
या घरांशिवाय बहुतांश कुटूंबांकडे अन्य कोणतेही निवासी घर किंवा मालमत्ता उपलब्ध नाही. सदर जागेमध्ये काही ठिकाणी रस्ते व खुल्या जागा उपलब्ध असून ले-आऊट नियमितीकरणासाठी शासनाने निश्चित केलेले शुल्क, प्रिमियम किंवा महसुल भरण्याचीही आमची तयारी आहे. सदर वस्तीचे नियमितीकरण झाल्यास परिसराचा नियोजनबद्ध विकास शक्य होईल, रहिवाशांना कायदेशीर सुरक्षितता प्राप्त होईल, असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनास जिल्हाधिकाऱ्यांना सकारात्मक प्रतिसाद देऊन संबंधित विषयावर सविस्तर चर्चा केली. लवकरच परिसराचे सर्वेक्षण करून शासनाच्या नियमानुसार सन २०११ पूर्वी अस्तित्वात असलेल्या निवासी अतिक्रमणांच्या नियमितीकरणाबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना नगरसेवक आनंद माळी, लक्ष्मण माळी, दिनेश माळी व दादा माळी उपस्थित होते.