(टुडे पान एक मेन)
---
NSK26H22460
नंदुरबार : शहरातील वर्दळीच्या रस्त्यांची पाहणी करताना अपर पोलिस अधीक्षक आशित कांबळे. शेजारी वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकार जगदीश गावित, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी.
---
नंदुरबार शहरात आता ‘वन-वे’
कोंडी फोडण्यासाठी पोलिस प्रशासनाचा निर्णय
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. २४ : शहरातील अंतर्गत रस्त्यांवर होणारी वाहनांची कोंडी आणि त्यामुळे पादचाऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेता, पोलिस प्रशासनाने आता ठोस पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील प्रमुख आणि वर्दळीच्या मार्गांवर लवकरच ‘वन-वे’ म्हणजेच एकतर्फी वाहतूकव्यवस्था सुरू करण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर ही यंत्रणा राबवून त्यानंतर ती कायम केली जाणार आहे. यामुळे शहरातील वाहतुकीला शिस्त लागेल आणि अपघातांचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे. अपर पोलिस अधीक्षक आशित कांबळे यांनी प्रवासी संघटनेसमवेत बैठक घेतल्यानंतर शहरातील रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली.
वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी शहराचे ‘वन वे’ मार्ग कसे असावेत, यासंदर्भात पोलिस प्रशासनाने प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी यांच्यासमवेत बैठक घेऊन शहरातील वाहतुकीला भेडसावणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या होत्या. त्यानंतर बुधवारी (ता. २४) अपर पोलिस अधीक्षकांनी मोटारसायकलने प्रवास करून शहरातील रस्त्यांवरील वाहतुकीची परिस्थिती पाहिली. त्या वेळी त्यांच्यासमवेत वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी जगदीश गावित, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी यांनीही रहदारीच्या प्रमुख रस्त्यांची पाहणी केली. पाहणीनंतर ‘वन वे’ वाहतूक सुरू करण्याबाबतचा अहवाल आता जिल्हा पोलिस अधीक्षक अश्विनी सानप यांच्याकडे सादर केला जाणार आहे. यासंदर्भात योग्य ते नियोजन करून लवकरच ‘वन वे’ वाहतुकीसाठी रस्ते निश्चित केले जाणार आहेत. यासंदर्भात पालिका प्रशासनाशी देखील चर्चा करण्यात येणार आहे. शहरात वाहतुकीची समस्या वाढली असून, याबाबत योग्य ते नियोजन होण्यासाठी प्रवासी संघटना अध्यक्ष गजेंद्र शिंपी यांनी पोलिस अधीक्षक सानप यांच्याशी चर्चा केली होती. पोलिस अधीक्षकांनी यासंदर्भात कार्यवाहीला प्रारंभ केला असून, याबाबतचे नियोजन पूर्ण झाल्यानंतर ‘वन वे’ वाहतूक सुरू केली जाणार आहे.
...या मार्गांवर होणार बदल
शहरातील अत्यंत गजबजलेला महात्मा गांधी मार्ग, सुभाष चौक, हाटदरवाजा, मंगळबाजार परिसर आणि स्टेशन रोड आदी परिसरामध्ये रस्त्याची रुंदी कमी आणि वाहनांची संख्या जास्त आहे. त्यामुळे दररोज वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत असते. नवीन नियोजनानुसार यातील काही मार्गांवरून एकाच बाजूने वाहनांना प्रवेश दिला जाईल, तर दुसऱ्या बाजूने येणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली जाईल. कोणत्या मार्गावरून वाहने आत येतील आणि कुठून बाहेर पडतील, याचा सविस्तर आराखडा वाहतूक पोलिसांनी नगर परिषदेच्या मदतीने अंतिम केला आहे. लवकरच या रस्त्यांवर ‘नो-एन्ट्री'' आणि ‘वन वे’चे फलक लावले जाणार आहेत.
व्यापारी-नागरिकांची बैठक
‘वन वे’ वाहतुकीचा निर्णय घेण्यापूर्वी पोलिस प्रशासनाने शहरातील प्रमुख व्यापारी संघटना, रिक्षाचालक संघटना आणि स्थानिक नागरिकांसोबत चर्चा केली आहे. सुरुवातीला काही दिवस नागरिकांना या नवीन मार्गांची माहिती होण्यासाठी चौकाचौकांत पोलिस कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. सुरुवातीला काही दिवस वाहनधारकांना ‘वन वे’ वाहतुकीबाबत केवळ मार्गदर्शन केले जाईल; मात्र त्यानंतर नियमांचे उल्लंघन करून ‘नो-एन्ट्री’मध्ये वाहन घालणाऱ्या चालकांवर थेट दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा शहर वाहतूक शाखेने दिला आहे.
पार्किंगच्या जागेतही बदल
‘वन वे’ वाहतूक सुरू करण्यासोबतच रस्त्याच्या एका बाजूला ‘सम-विषम’ पार्किंग किंवा संपूर्ण रस्त्यावर एकाच बाजूला पार्किंगची सोय केली जाणार आहे. त्यामुळे रस्ता वाहनांसाठी पूर्णपणे मोकळा राहील. पोलिस प्रशासनाच्या या धाडसी निर्णयामुळे नंदुरबारकरांना रोजच्या त्रासातून दिलासा मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.