फोटो : H22459
नाशिक : आडगाव शिवारात कत्तलखान्यावर करण्यात आलेल्या कारवाईप्रसंगी शहर गुन्हे शाखा युनिट एकचे पथक.
कत्तलखान्यातून १० गोवंशांची सुटका
---
शहर गुन्हे शाखेची कारवाई : विधीसंघर्षित बालकासह एकाला अटक
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २४ : कत्तलीच्या उद्देशाने गोठ्यात डांबलेल्या १० गोवंशांची सुटका करण्यात शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकला यश आले. या प्रकरणी एका संशयितासह विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले असून, एक लाख ९० हजार रुपये किमतीचे गोवंश जप्त केले आहे.
अंमलदार विशाल काठे, अमोल कोष्टी यांना कमलवाडी, निमसे मळा परिसरातील गोठ्यात कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे डांबून ठेवल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, विशाल काठे, प्रदीप म्हसदे, विशाल देवरे, मिलिंदसिंग परदेशी, संदीप भांड, अमोल कोष्टी, मुक्तार शेख व समाधान पवार यांच्या पथकाने बुधवारी (ता. २४) पहाटे कमलवाडीतील संशयित गोठ्यावर छापा टाकला. या वेळी गोठ्यात १० गोवंश बांधून ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी जागेवरच संशयित काल्या ऊर्फ इर्शाद अब्दुल रेहमान कुरेशी (वय ३८, रा. सावरकर गार्डन, दिंडोरी रोड, नाशिक) यास अटक केली. संशयित कुरेशी याने ही जनावरे नाझीम शेख आणि एका अल्पवयीन मुलाकडून घेतल्याचे कबूल केले. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करीत नांदूर नाका परिसरातून एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले. ही जनावरे कत्तलीसाठी संगमनेर येथे नेण्यात येणार असल्याचे चौकशीतून समोर आले. पोलिसांनी सुटका केलेल्या एक लाख ९० हजार रुपये किमतीच्या सर्व १० गोवंशांना तत्काळ तपोवन येथील कृषी गोसेवा ट्रस्टच्या स्वाधीन केले. या प्रकरणी संशयितांविरोधात आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.