चिमुकलीवरील अत्याचारप्रकरणी
वयोवृद्धाला पाच वर्षांची शिक्षा व दंड
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २४ : चॉकलेटचे आमिष दाखवून अवघ्या चार वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ६२ वर्षीय आरोपीला विशेष सत्र न्यायालयाने दोषी ठरवत पाच वर्षे साध्या कारावासाची आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
सुकदेव तुकाराम पवार (वय ६२, रा. शिवशक्ती चौक, त्रिमूर्ती चौक, सिडको) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. २६ मार्च २०२२ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पीडित चिमुकली घराबाहेर खेळत असताना शेजारी राहणाऱ्या पवारने तिला चॉकलेटचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करत विनयभंग केला होता. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात पोक्सो कायदा आणि विनयभंगाच्या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक हरसिंग पावरा यांनी केला. तपासादरम्यान आरोपीविरुद्ध पुरावे संकलित करून जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
या खटल्याची सुनावणी विशेष सत्र न्यायाधीश श्रीमती के. के. पाटील यांच्या न्यायालयात झाली. फिर्यादी, साक्षीदार, पंच तसेच तपासी अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपी सुकदेव पवार याला दोषी ठरवत पाच वर्षे साध्या कारावासाची व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सुलभा सांगळे यांनी सरकार पक्षातर्फे कामकाज पाहिले. तर कोर्ट अंमलदार दिनकर खैरनार, महिला हवालदार छाया पाटील आणि पैरवी अंमलदार रामनाथ आजगे यांनी खटल्याच्या पाठपुराव्यासाठी विशेष प्रयत्न केले.