मतदार यादी पुनरीक्षण पारदर्शकपणे राबवा
एस. चोकलिंगम यांचे निर्देश; पात्र मतदार वगळला जाणार नाही याची दक्षता घ्या
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.२४ : राज्यातील विशेष सखोल मतदार पुनरीक्षण (एसआयआर) मोहीम पारदर्शक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पद्धतीने राबविण्यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी. कोणत्याही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीतून वगळले जाणार नाही, तसेच अपात्र व्यक्तींची नोंद राहणार नाही, याची खात्री करावी, असे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी दिले.
नाशिक रोड येथील विभागीय आयुक्तालयात बुधवारी (ता.२४) झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी विशेष सखोल मतदार पुनरीक्षण कार्यक्रमाचा आढावा घेतला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, सहमुख्य निवडणूक अधिकारी सुनील पवार, तसेच नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते.
चोकलिंगम म्हणाले, की मतदार याद्या अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक बनविणे हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यासाठी घरोघरी जाऊन मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. मोहिमेच्या यशस्वितेसाठी व्यापक जनजागृती करण्याबरोबरच नागरिक व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनाही सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहित करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
बैठकीत विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी मोहिमेच्या तयारीची माहिती दिली. तर पाचही जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील अंमलबजावणीची सद्यःस्थिती मांडली. यावेळी पाचही जिल्ह्यांतील उपजिल्हा निवडणूक अधिकारी व उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.
३० जूनपासून घरभेटी
मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) ३० जून ते २९ जुलै या कालावधीत मतदारांच्या घरी जाऊन माहितीची पडताळणी करणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने बीएलओंना मोहिमेचे महत्त्व समजावून सांगावे. कोणताही पात्र मतदार यादीतून वगळला जाणार नाही आणि अपात्र व्यक्तीची नोंद राहणार नाही, यासाठी काटेकोर दक्षता घ्यावी, असे निर्देश चोकलिंगम यांनी दिले.
फोटो क्रमांक : एच-22466