धुळे ः टुडे १ साठी, ॲंकर
--
गरजेनुसार लोगो छायाचित्र ः 22464
--
ई-पीक पाहणीच्या त्रासातून शेतकऱ्यांची सुटका!
-
पंधरा जुलैपासून नियुक्त सहाय्यकांमार्फत होणार नोंदणी; शासनाचा निर्णय
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २४ : खरीप हंगामातील पिकांची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांना आता स्वतः ई- पीक पाहणी करण्यासाठी धावपळ करावी लागणार नाही. मागील काही वर्षांतील तांत्रिक अडचणी आणि शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद लक्षात घेऊन राज्य शासनाने यंदापासून ही जबाबदारी नियुक्त सहाय्यकांकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी १५ जुलैपासून ही मोहीम राज्यासह जिल्ह्यात सुरू होणार असल्याची माहिती येथील कृषी यंत्रणेने दिली.
-
राज्य शासनाने २०२२ पासून मोबाईल अॅपद्वारे ई- पीक पाहणीची अंमलबजावणी सुरू केली होती. मात्र, ग्रामीण भागातील इंटरनेटची समस्या, अनेक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नसणे आणि अॅपमधील तांत्रिक त्रुटींमुळे या प्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. यामुळे अनेक शेतकरी पीक नोंदीपासून वंचित राहिले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने यंदाच्या खरीप हंगामापासून पीक पाहणी पूर्णपणे सरकारी देखरेखीखाली करण्याचा निर्णय घेतला आहे.
-
महत्त्वाचा निर्णय
या मोहिमेसाठी नियुक्त सहाय्यकांसोबतच स्थानिक महिला बचत गटांतील सदस्यांचीही मदत घेतली जाणार आहे. यापूर्वी पिकाची नोंदणी करताना लागवड क्षेत्राच्या ५० मीटर अंतरात उभे राहून छायाचित्र घेण्याची अट होती. आता प्रत्यक्ष पिकाच्या २० मीटर अंतरात जाऊन अचूक नोंदणी करावी लागणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया केंद्र शासनाच्या अॅग्रीस्टॅक योजनेशी जोडण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी यात नोंदणी करून शेतकरी ओळख क्रमांक मिळवला आहे, त्यांना प्रत्यक्ष पाहणीपूर्वी मोबाईलवर संदेश (एसएमएस) पाठविला जाईल. पंधरा जुलैपासून ‘एमएच-डीसीएस अॅप’च्या माध्यमातून पीक पाहणीची नोंदणी सुरू होईल. यंदा शेतकऱ्यांना स्वतः नोंदणी करण्याची आवश्यकता नसून संपूर्ण प्रक्रिया नियुक्त सहाय्यकांमार्फत पार पडणार असल्याचे भूमी अभिलेख यंत्रणेनेही सांगितले.