धुळे ः टुडे १ साठी
---
फोटो क्रमांक ः 22465
धुळे : शहरात मंगळवारी टिपलेली पावसाची स्थिती.
---
धुळे जिल्ह्यास ‘ऑरेंज अलर्ट’
-
मुसळधारसह विजांचा कडकडाट शक्य; सतर्कतेचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २४ : मुंबईच्या भारतीय हवामान विभागाने धुळे जिल्ह्यासाठी पुढील तीन तासांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. या कालावधीत जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, मेघगर्जना, विजांचा कडकडाट तसेच ताशी वेगवान वारे वाहण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने संपूर्ण यंत्रणेला बुधवारी (ता. २४) दुपारपासून हायअलर्टवर ठेवले असून, नागरिकांना विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
विजांचा कडकडाट आणि वादळी पाऊस सुरू असताना नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.
-
१४-१
जाहीर नियमावली, सूचना
प्रवास टाळा : पूरग्रस्त किंवा पाणी साचलेल्या रस्त्यांवरून प्रवास करणे पूर्णपणे टाळावे. नदी, नाले, ओढे व धरण परिसरात जाणे धोकादायक ठरू शकते. झाडांखाली आश्रय नको : मेघगर्जना व विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली, मोकळ्या मैदानात किंवा उंच ठिकाणी उभे राहू नये. सुरक्षित इमारतीचा आश्रय घ्यावा. वीज उपकरणांचा वापर टाळा : विजा चमकत असताना मोबाईल चार्जिंग करणे किंवा इतर वीज उपकरणांचा वापर करणे टाळावे. वाहनचालकांसाठी सूचना : पावसामुळे दृश्यमानता कमी होत असल्याने वाहनचालकांनी वाहनाचा वेग नियंत्रित ठेवावा. पाण्याखाली गेलेल्या पुलांवरून किंवा रस्त्यांवरून वाहन पुढे नेण्याचे धाडस करू नये.
-
१४-१
शेतकऱ्यांसाठी सल्ला
शेतकरी बांधवांनी काढणीस आलेली पिके तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावीत. शेतातील वीजपंप व कृषी उपकरणे सुरक्षित करावीत. तसेच, जनावरे झाडांखाली न बांधता उंच व सुरक्षित गोठ्यात बांधावीत.
-
१४-१
...चौकट...
१४-१
घरात ‘या’ गोष्टी ठेवा, अफवा टाळा
नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी घरात टॉर्च (विजेरी), पूर्ण चार्ज केलेला मोबाईल, पॉवर बँक, पिण्याचे पाणी व आवश्यक औषधांचा साठा जवळ ठेवावा. कुटुंबातील सदस्यांचे तसेच प्रशासनाचे आपत्कालीन संपर्क क्रमांक हाताशी ठेवावेत. हवामान विभाग व प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या ताज्या सूचनांकडेच नागरिकांनी लक्ष ठेवावे. सोशल मीडियावर येणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. प्रशासनाकडून स्थलांतराच्या सूचना मिळाल्यास नागरिकांनी तत्काळ सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.