फोटो क्रमांक ः 22472
वाडी ः वीज कोसळून लागलेल्या आगीत जळून खाक झालेले दुकान.
--
वाडीत वीज कोसळून घरासह दुकानाला आग
-
शिंदखेडा तालुक्यात ८ लाखांचे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २३ : शिंदखेडा तालुक्यातील वाडी येथे मंगळवारी (ता. २३) सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात एका घरावार वीज कोसळली. या दुर्घटनेत घराला आणि घराला लागूनच असलेल्या दुकानाला भीषण आग लागली. आगीत दुकानातील संपूर्ण साहित्य खाक झाले असून, सुमारे सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
वाडी येथील चतुर गांगजी गिरासे यांच्या घरातच पेडकाई माता पंक्चर, हार्डवेअर ॲन्ड मोटार सर्व्हिस या नावाचे दुकान आहे. रात्री साडेनऊच्या सुमारास दुकान बंद करून गिरासे कुटुंबातील चारही सदस्य घरात झोपले होते. त्यानंतर रात्री दहा ते साडेदहाच्या सुमारास घरात धूर साचल्याने आणि जीव गुदमरल्यासारखा वाटू लागल्याने सर्वांना जाग आली. त्यांनी तत्परतेने घराबाहेर धाव घेतली.
दुकानात अग्नितांडव
कुटुंबीयांनी बाहेर येऊन दुकानाचे शटर उघडून पाहिले असता, आत अग्नितांडव सुरू असल्याचे दिसून आले. दुकानात मोठ्या प्रमाणावर रबरी टायर, सोल्यूशन, इंजिन ऑइल आणि पीव्हीसी पाईप्ससारखे ज्वलनशील साहित्य असल्याने आगीने अवघ्या काही क्षणांत रौद्ररूप धारण केले. ग्रामस्थांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते.
-
भरपाईची मागणी
वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात वीज कोसळल्यानेच ही आग लागली. पीडित गिरासे कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, महसूल विभागाने तातडीने घटनेचा पंचनामा करून योग्य ती आर्थिक भरपाई द्यावी, अशी मागणी वाडीचे सरपंच सुवर्णसिंग गिरासे यांनी केली आहे.