NSK26H22475
जळगाव : कापूस बियाण्यांचे वाटप करताना सहाय्यक कृषी अधिकारी सुरेखा सपकाळे.
--
कापूस उत्पादकता अभियानांतर्गत बियाण्यांचे वाटप
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २५ : महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र पुरस्कृत कापूस उत्पादकता अभियान २०२६-२७ अंतर्गत करंज येथे बुधवारी (ता. २४) एकात्मिक पीक व्यवस्थापन या घटकांतर्गत तापी माई शेतकरी गटाला कापूस पिकाच्या बियाण्यांचे शंभर टक्के अनुदानावर वाटप करण्यात आले.
या उपक्रमाचा उद्देश कापूस पिकाची उत्पादकता वाढविणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देणे तसेच शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत करून उत्पन्न वाढीस हातभार लावणे हा आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे कापूस बियाणे मोफत उपलब्ध करून देण्यात आले. कार्यक्रमात सहाय्यक कृषी अधिकारी सुरेखा सपकाळे यांनी शेतकऱ्यांना कापूस लागवडीचे नियोजन, बियाण्यांचा योग्य वापर, पीक संरक्षण तसेच एकात्मिक पीक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती करण्याचे आवाहन केले. यावेळी करंज गावचे सरपंच समाधान प्रभाकर सपकाळे, उपसरपंच वासुदेव तुकाराम सपकाळे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तापीमाई शेतकरी गटाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर शिवदास पाटील यांनी शासनाच्या या उपयुक्त योजनेबद्दल कृषी विभागाचे आभार मानले. या कार्यक्रमामुळे करंज परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले असून शासनाच्या कृषी योजनांचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभाग सातत्याने प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले.