ॲंकर
NSK26H22477
जळगाव : प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाची अंमलबजावणी करताना कर्मचारी.
----
रस्ता सुरक्षिततेबाबत घंटागाडीद्वारे जनजागृती
प्रादेशिक परिवहन विभागाचा अनोखा उपक्रम; ध्वनिफितीद्वारे संदेश
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २५ : रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रादेशिक परिवहन विभागाने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. शहरातील घंटागाडी व कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा नियमांची ध्वनिफित प्रसारित करून जनजागृती करण्यात येत आहे.
‘रस्ता सुरक्षा’ अभियानांतर्गत मंगळवारी (ता. २३) हा उपक्रम राबविण्यात आला. प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मोटार वाहन निरीक्षक विनोद चौधरी यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली. शहरातील विविध भागांत नियमित फिरणाऱ्या घंटागाडी व कचरा वाहनांमधून रस्ता सुरक्षेसंदर्भातील संदेश, वाहतूक नियमांचे पालन, हेल्मेटचा वापर, सीटबेल्ट बांधण्याचे महत्त्व, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे, मद्यपान करून वाहन न चालविणे आदी बाबींविषयी ध्वनिफितीद्वारे नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. या माध्यमातून शहराच्या कानाकोपऱ्यात रस्ता सुरक्षेचा संदेश पोहोचणार असल्याने जनजागृतीला अधिक व्यापक स्वरूप मिळणार आहे. रस्ते अपघात रोखण्यासाठी केवळ दंडात्मक कारवाई पुरेशी नसून नागरिकांमध्ये नियमांचे पालन करण्याची मानसिकता निर्माण होणे आवश्यक आहे. त्यासाठी लोकांच्या दैनंदिन संपर्कात येणाऱ्या वाहनांचा वापर करून जनजागृती करण्याचा हा प्रयत्न असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या उपक्रमामुळे वाहतूक नियमांविषयी नागरिकांमध्ये जागरूकता वाढेल आणि भविष्यात अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
चौकट
नियमांचे पालन करण्याचे आवाहन
उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी परिवहन विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. नागरिकांनी या अभिनव उपक्रमाचे स्वागत करत रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. शहरभर सातत्याने ध्वनिफितीच्या माध्यमातून संदेश प्रसारित झाल्यास वाहतूक नियमांचे पालन वाढून सुरक्षित वाहतुकीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.