शेतरस्त्यांसाठी ५० कोटी मंजूर
जिल्ह्यातील नऊ तालुक्यांना पाच ते साडेसात कोटींचा निधी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २५ : मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्त्यांसाठी राज्य शासनाने निधी मंजूर केला आहे. नाशिक जिल्ह्यातील नऊ तालुक्यांना ५० कोटी रुपये मिळणार असून, बागलाण मतदारसंघास साडेसात कोटी रुपये मिळतील. मात्र यात मालेगाव आणि नांदगावचा समावेश नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
---------------
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्यासाठी बारमाही पक्के रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने पाणंद रस्ते योजना सुरू केली. त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. महसूल व वन विभागाने २३ जून २०२६ ला शासनादेश प्रसिद्ध करत जिल्ह्यातील नऊ तालुक्यांना एकूण ५० कोटी रुपये मंजूर केले. यात कळवण, येवला, सिन्नर, निफाड, दिंडोरी, देवळाली, इगतपुरी या मतदारसंघांचा समावेश आहे. त्यांना प्रत्येकी पाच कोटी रुपये मिळतील. योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी शासनाने एक हजार कोटी रुपये निधी मंजूर केला होता. सीएसआर फंडातूनही निधी जमा केला जाणार आहे.
शासनाने ३० मे २०२६ ला या संदर्भात प्रशासकीय मान्यता दिलेली होती. मात्र, त्यात दुरुस्ती करून सुधारित आदेश जारी केला. त्यानुसार ५० टक्के काम पूर्ण झाल्याशिवाय निधी मागणी नोंदविता येणार नाही. काम पूर्ण झाल्यानंतर काम पूर्णत्वाचा दाखला त्वरित अपलोड करण्याचे आदेश दिले आहेत.
…
१६-१
मालेगाव, नांदगावचा समावेश नाही
शेत पाणंद रस्ते ही योजना ग्रामीण भागातील मतदारसंघासाठी असल्यामुळे शहरी मतदारसंघ त्यातून वगळले आहेत. पण त्यासोबतच जिल्ह्यातील मालेगाव व नांदगाव या दोन मतदारसंघांचाही सुधारित आदेशात समावेश नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
----------------