फोटो : H22501
-----------------
महापौर, उपमहापौरांनी केला बस प्रवास
सिटीलिंकच्या डिजिटल तिकीट प्रणालीचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २५ : नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या सिटीलिंक बसमध्ये प्रवाशांसाठी डिजिटल तिकीट काढण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या अत्याधुनिक यंत्रणेचा शुभारंभ गुरुवारी (ता. २५) महापौर हिमगौरी आहेर आणि उपमहापौर विलास शिंदे यांच्या हस्ते राजीव गांधी भवन बस स्टॉप येथे झाला.
शुभारंभानंतर महापौर आणि उपमहापौरांनी राजीव गांधी भवन ते कुलकर्णी गार्डन असा बस प्रवास करून प्रत्यक्ष डिजिटल तिकीट काढले. यापुढे प्रवाशांना बसमध्येच युपीआय, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड या माध्यमातून त्वरित, सुलभ आणि सुरक्षितपणे तिकीट मिळणार आहे. त्यामुळे सुट्ट्या पैशांवरून वाहक आणि प्रवासी यांच्यात होणारे वाद टळतील, तसेच तिकीट वितरण प्रक्रिया अधिक वेगवान, पारदर्शक आणि अचूक होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. सिटीलिंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार मुंडे यांनी सांगितले की, प्रवाशांसाठी तंत्रज्ञानाधारित आणि स्मार्ट सेवा देण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे. नागरिकांनी या डिजिटल सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले. कार्यक्रमाला मुख्य महाव्यवस्थापक बाजीराव माळी, महाव्यवस्थापक राहुल तोरो, रघुनाथ कांबळे, उपमहाव्यवस्थापक संजय सुर्वे, विकास जोशी, जनसंपर्क अधिकारी दीपाली घाटोळ, आयटी व्यवस्थापक दिनेश देसले यांच्यासह सिटीलिंकचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------