पावसाळी समस्यांसाठी ‘मॉन्सून टास्क फोर्स’ सज्ज
२६ जूनपासून प्रभागनिहाय विशेष मोहिम; ६ स्वतंत्र पथके तैनात
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २५ : पावसाळ्यात नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि स्थानिक पातळीवरील समस्या तातडीने सुटाव्यात यासाठी महापालिकेने प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या समन्वयातून विशेष ‘मॉन्सून टास्क फोर्स’ कार्यान्वित केला आहे. शहरातील सहा विभागांसाठी प्रत्येकी एक असे एकूण सहा पथक नियुक्त करण्यात आले असून २६ जूनपासून प्रभागनिहाय विशेष मोहीम सुरू होणार आहे.
प्रत्येक पथक संबंधित नगरसेवकांच्या थेट समन्वयात प्रत्यक्ष काम करणार आहे. नालेसफाई, गटार साफसफाई, पाणीपुरवठ्यातील अडचणी, पाइपलाइन गळती, रस्त्यांवरील खड्डे, पाणी साचणारी ठिकाणे आणि धोकादायक झाडांच्या फांद्या यांसारख्या पावसाळी समस्यांवर तातडीने उपाययोजना केली जाणार आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील तक्रारी नगरसेवकांकडे मांडल्यास त्या तातडीने पथकाकडे पाठवून निपटारा केला जाईल. प्रत्येक पथकात महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि आवश्यक मनुष्यबळासह सुमारे १५ सदस्य असणार आहेत. जेसीबी, टिप्पर, क्रेन आणि तांत्रिक साहाय्यही उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे कामांची गती वाढणार आहे. ही विशेष मोहीम २६ जूनपासून सुरू होणार असून प्रत्येक विभागात एका प्रभागासाठी सलग चार दिवस कामे केली जातील. एका प्रभागातील कामे पूर्ण झाल्यानंतर पथक पुढील प्रभागात जाईल. पंचवटी, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नाशिक रोड, नवीन नाशिक आणि सातपूर या सहाही विभागांसाठी प्रभागनिहाय वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.
-------------------कोट-------
फोटो घेणे
पावसाळ्यात समस्या निर्माण झाल्यानंतर उपाय करण्यापेक्षा समस्या निर्माणच होऊ नयेत यासाठी परिसरातील अडचणी संबंधित नगरसेवकांकडे कळवाव्यात.
- मनिषा खत्री, आयुक्त, महापालिका.
-----------कोट
फोटो घेणे
महापालिका व नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नांतून नाशिक शहर पावसाळा सुरक्षित, स्वच्छ आणि सुरळीत पार पडेल.
- हिमगौरी आहेर-आडके, महापौर.