३०-२
स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या
समस्या सोडवाव्यात
मकवाना : जिल्हाधिकाऱ्यांकडे आढावा बैठक
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २५ : स्वच्छता कर्मचाऱ्यांना मूलभूत सोयी-सुविधा पुरविताना त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य द्यावे, असे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या केंद्रीय संनियंत्रण समितीचे सदस्य भगवती प्रसाद मकवाना यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (ता. २५) झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, समाजकल्याणचे सहायक आयुक्त देवीदास नांदगावकर, सहायक पोलिस उपायुक्त नितीन देशमुख यांच्यासह अधिकारी, सफाई कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
भगवती मकवाना म्हणाले, की अधिकाऱ्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे प्रश्न संवेदनशीलपणे सोडविले पाहिजे. या कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा पुरविताना कायद्यानुसार किमान वेतन, लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार लाभ मिळण्याबाबत दक्षता घ्यावी. या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय विमा, विमा संरक्षणाच्या कवचासह आयुष्मान कार्ड मोहीम राबवावी, अशा सूचना केल्या. महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून अशा कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण करावे, असेही निर्देश मकवानांनी दिले. आयुष प्रसाद यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी विविध उपक्रम राबविले जात असून, त्याचा नियमितपणे आढावा घेण्यात येत असल्याचे सांगितले.
------------------