टूडे साठी महत्वाचे
------------------
सिंहस्थ कामांमध्ये हलगर्जीपणा
१२ ठेकेदारांवर दंडाची कारवाई, प्रतिदिन २.८१ लाख वसुली
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २५ : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुरू असलेल्या रस्तेकामांमध्ये गुणवत्ता आणि गतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापौर हिमगौरी आडके व आयुक्त मनीषा खत्री यांच्या थेट तपासणीनंतर १२ ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, काम पूर्ण होईपर्यंत रोज तब्बल २ लाख ८१ हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे.
महापालिकेमार्फत पहिल्या टप्प्यात १,२३० कोटी रुपये खर्चून शहरातील २८ रस्त्यांची कामे सुरू आहेत. ही सर्व कामे मार्च २०२७ पूर्वी पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र अनेक ठिकाणी निकृष्ट साहित्याचा वापर, घाईघाईने काम आणि मुदतीत हलगर्जीपणा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तक्रारीनंतर आयुक्त आणि शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी थेट रस्त्यावर जाऊन पाहणी केली. त्या वेळी अनेक कामांमध्ये अनियमितता आणि संथगती आढळून आली. त्यानुसार बांधकाम विभागाने कडक पावले उचलली आहेत. दंडात्मक कारवाईनुसार ९ ठेकेदारांना कामातील दिरंगाईबद्दल प्रतिदिन १० हजार, दोन ठेकेदारांना गुणवत्तेत तडजोड केल्याबद्दल प्रतिदिन ५० हजार आणि एका ठेकेदाराला प्रतिदिन ९१ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. हा दंड २४ जूनपासून लागू झाला आहे. याआधीही चार ठेकेदारांवर दंडाची कारवाई करण्यात आली होती. आता १२ ठेकेदारांवर कारवाई झाल्याने इतर ठेकेदारांमध्येही खळबळ उडाली आहे.
-----------कोट--------
सिंहस्थाची कामे विहित कालावधीत पूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे. काही कामांच्या गुणवत्तेबाबत तडजोड केली जात असल्याच्या तक्रारी आल्यानंतर १२ ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. काम पूर्ण होईपर्यंत हा दंड सुरू राहणार आहे.
- संजय अग्रवाल, शहर अभियंता, महापालिका.
------------------------------