अवकाळीग्रस्त नुकसानीसाठी
१४ कोटींचा निधी मंजूर
उपशीर्षक
जळगाव जिल्ह्यातील १४ हजारांवर शेतकऱ्यांना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २५ : जिल्ह्यात एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १४ कोटी ५० लाख ८९ हजारांची मदत मंजूर झाली आहे. राज्य शासनाने गुरुवारी (ता. २५) यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला.
जळगाव जिल्ह्यातील १४ हजार ३६० बाधित शेतकरी आणि सात हजार ९३४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान या मदतीत समाविष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामागे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांच्यासह आमदारांचा पाठपुरावा महत्त्वाचा ठरला.
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती मिळताच पालकमंत्री पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला तातडीने पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच मुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांकडे वेळोवेळी बैठका व पत्रव्यवहार करून जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याची मागणी लावून धरली होती.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल विभाग, कृषी विभागाने शासनाकडे नुकसान अहवाल सादर केला होता. त्याला यश मिळत राज्य शासनाने राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी एकूण १०६ कोटी ५६ लाख ४८ हजारांच्या मदतीस मंजुरी दिली असून, जळगाव जिल्ह्यासाठी तब्बल १४ कोटी ५० लाख ८९ हजार रुपये मदत मंजूर करण्यात आली आहे.
----
कोट
अवकाळी पावसामुळे एप्रिल व मेमध्ये जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. शासनाने सकारात्मक निर्णय घेतल्याने खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
- गुलाबराव पाटील, पालकमंत्री, जळगाव