22519
नंदूरबार : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन देताना पुरूषोत्तम काळे, गणेश पोतदार, अंकुश माळी.
सेवाज्येष्ठ टीईटी पात्र शिक्षकांवरील अन्याय थांबवावा
शिक्षक परिषदेचे ग्रामविकास मंत्री गोरे यांना साकडे
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. २५ : राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या विस्तार अधिकारी (शिक्षण), केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रियेत सेवाज्येष्ठ टीईटी व सीटीईटी पात्र शिक्षकांवर मोठा अन्याय होत आहे. हा अन्याय थांबविण्यात यावा, या मागणीसाठी अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन दिले.
शिक्षण संचालकांनी जारी केलेल्या एका पत्रामुळे संपूर्ण पदोन्नती प्रक्रियेत गोंधळ निर्माण झाला असून, ग्रामविकास विभागाशी समन्वय न साधता ही प्रक्रिया राबविली जात असल्याचा आरोप या वेळी शिष्टमंडळाने केला. या वादावर सर्व बाबींची काटेकोर तपासणी करून योग्य ती न्याय्य कार्यवाही करण्याचे आश्वासन मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहे. यासह शिक्षण संचालकांच्या ज्या पत्रामुळे पदोन्नती प्रक्रियेत संभ्रम निर्माण झाला आहे, त्या पत्राला स्थगिती देण्यात यावी, पदोन्नती समितीच्या बैठकीच्या अंतिम दिनांकापर्यंत ज्या सेवाज्येष्ठ शिक्षकांनी टीईटी/सीटीईटी पात्रता प्राप्त केली आहे, त्यांची ज्येष्ठता ग्राह्य धरूनच पदोन्नती प्रक्रिया राबविण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला द्यावेत. कृत्रिम ''कट-ऑफ'' दिनांक निश्चित करून पात्र शिक्षकांना जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचा गंभीर मुद्दा शिष्टमंडळाने मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कार्यवाह पुरुषोत्तम काळे, कोकण अध्यक्ष गणेश पोतदार, ठाणे जिल्हाध्यक्ष अंकुश माळी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
------
तोपर्यंत लढा सुरूच राहणार!
पदोन्नती संदर्भातील १८ जुलै २०२५ रोजीची अधिसूचना तसेच संबंधित सर्व तांत्रिक बाबींची तपासणी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले असल्याचे शिक्षक परिषदेने सांगितले. मात्र, अन्यायग्रस्त सेवाज्येष्ठ शिक्षक आणि गुणवत्ता यादीत असूनही वंचित राहिलेल्या उमेदवारांना न्याय मिळेपर्यंत संघटनेचा हा लढा सुरूच राहील, असा ठाम निर्धार शिक्षक परिषदेने व्यक्त केला आहे.