NSK26H22520
---
महाराष्ट्र पणन महासंघ
अध्यक्षपदी रोहित निकम
उपशीर्षक
इतिहासात प्रथमच भाजपकडे नेतृत्व
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २५ : महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन सहकारी शिखर संस्थेच्या (पणन महासंघ) अध्यक्षपदी रोहित निकम यांची, तर उपाध्यक्षपदी राहुल काकडे यांची सर्वानुमते निवड झाली आहे.
विशेष म्हणजे, गेल्या ७० वर्षांनंतर प्रथमच या महत्त्वाच्या सहकारी संस्थेच्या नेतृत्वाची धुरा भाजपशी संबंधित नेतृत्वाकडे आली आहे.
मुंबई येथील पणन महासंघाच्या मुख्यालयात गुरुवारी (ता. २५) सकाळी अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत रोहित निकम यांची अध्यक्षपदी आणि राहुल काकडे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहनिबंधक, सहकारी संस्था मुंबईचे शाहजी पाटील यांनी कामकाज पाहिले.
रोहित निकम यांनी आजोबा बॅरिस्टर देवराव निकम आणि वडिलांचा सहकार क्षेत्रातील वारसा पुढे नेत विविध संस्थांमध्ये नेतृत्वाची भूमिका बजावली आहे. सध्या ते जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाचे संचालक असून, जळगाव जिल्हा कृषी उद्योग व सर्व सेवा सहकारी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आहेत.