फोटो : H22353
----------
त्र्यंबक रोडवरील काँक्रिटीकरण पूर्णत्वाकडे
लवकरच वाहतुकीसाठी खुला; आयुक्तांची माहिती
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २६ : सिंहस्थाच्या तयारीचा भाग म्हणून नाशिक- त्र्यंबकेश्वर जोडणाऱ्या त्र्यंबक रोडच्या काँक्रीटीकरणाने वेग घेतला आहे. त्र्यंबक नाका ते बॉश सर्कल आणि आयटीआय सिग्नल ते सातपूर गाव या दोन टप्प्यांतील व्हाईट टॅपिंगची कामेे अंतिम टप्प्यात असून, लवकरच हा मार्ग नागरिकांसाठी खुला होणार आहे.
खडकाळी ते आयटीआय आणि आयटीआय ते मनपा हद्द या संपूर्ण प्रकल्पाअंतर्गत हे काम सुरू आहे. सध्या रस्त्यावर अंतिम स्वच्छता आणि तांत्रिक प्रक्रिया सुरू आहेत. काँक्रिटच्या जाडीची तपासणी केली असता, किमान १८० मिमीच्या निकषाविरुद्ध प्रत्यक्षात १८५ मिमी जाडी आढळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. विद्यमान डांबरी रस्त्यावरच बॉन्डेड व्हाईट टॅपिंग तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन काँक्रीट थर टाकण्यात आला आहे.आज महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कंत्राटदारांकडून कामाचा आढावा घेतला. उर्वरित अंतिम कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. शहरातील रस्ते विकासात गुणवत्ता आणि टिकाऊपणा हेच आमचे प्राधान्य आहे. नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार पायाभूत सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे आयुक्त खत्री यांनी पाहणीनंतर सांगितले. त्र्यंबक रोड हा सिंहस्थ काळात लाखो भाविकांचा मुख्य मार्ग ठरणार असल्याने, हा रस्ता खुला झाल्यानंतर सातपूर, अंबड आणि त्र्यंबकच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
------------------------