फोटो : H22509
------------
शाळा-क्लासेसचे फायर, स्ट्रक्चरल ऑडिट करा
‘मनविसे’ची मागणी; शिक्षणधिकाऱ्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २६ : शहरातील शासकीय, निमशासकीय आणि खाजगी शाळा, महाविद्यालये तसेच कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने फायर ॲन्ड सेफ्टी ऑडिट आणि स्ट्रक्चरल ऑडिट करून तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केली आहे. यासंदर्भात मनविसेच्या शिष्टमंडळाने शिक्षणाधिकारी डॉ. मिता चौधरी यांची भेट घेऊन निवेदन दिले. शहरातील विविध शैक्षणिक संस्था आणि प्रशिक्षण केंद्रांमध्ये दररोज हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी उपस्थित असतात. मात्र अनेक ठिकाणी फायर सेफ्टी नियमांचे पालन होत नसल्याच्या आणि इमारतींचे नियमित स्ट्रक्चरल ऑडिट न केल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे भविष्यात दुर्घटना घडून विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे निवेदनात म्हटले आहे. सर्व शैक्षणिक संस्था आणि कोचिंग क्लासेसचे फायर ॲन्ड सेफ्टी ऑडिट झाले आहे का? याची तपासणी करावी. संबंधित संस्थांकडे वैध फायर सेफ्टी सर्टिफिकेट आणि फायर एनओसी उपलब्ध आहे का? याची पडताळणी करावी. तसेच सर्व संस्थांचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले आहे का? हे पाहावे. ज्या संस्थांनी आवश्यक ऑडिट केलेले नाही किंवा सुरक्षा नियमांचे पालन केलेले नाही, त्यांच्यावर नियमानुसार तात्काळ कारवाई करावी. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचे निर्देश द्यावेत आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सार्वजनिक करावा, असे मनविसेने म्हटले आहे. यावेळी मनविसेचे शहराध्यक्ष ललित वाघ, प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य उमेश भोई, जिल्हाध्यक्ष गणेश मोरे, उपजिल्हाध्यक्ष नितीन धानापुणे, विभागाध्यक्ष मेघराज नवले, गणेश शेजूळ यांच्यासह मनसे शाखाध्यक्ष दीपक येलमामे, दर्शन बोरसे, मयूर जैन, मोहित पाटील, कुणाल पाटील, मयूर शिंदे आदी उपस्थित होते.
------------------------