टूडे साठी
-----------
तणनाशक खरेदीसाठी २४ लाखांची तरतूद
महापालिकेकडून उद्यान स्वच्छतेची मोहीम
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २६ : पावसाळ्यात शहरातील उद्याने आणि मोकळ्या जागांवर तण- गवताचा विळखा पडतो. त्यातून डासांची पैदास होऊन साथीचे आजार पसरण्याचा धोका असतो. ही समस्या रोखण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागातर्फे तब्बल ४८०० लिटर तणनाशक खरेदी केले जाणार असून, त्यावर २४ लाख रुपये खर्च होणार आहेत.
दरवर्षी पावसाळा सुरू होताच उद्याने, रस्त्यांचे दुभाजक, भूखंड येथे तण वाढते. याबाबत नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडून सातत्याने तक्रारी येतात. यंदा आयुक्तानी याची गंभीर दखल घेतली असून, तणनाशक फवारणीची व्यापक मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. मनपाने तणनाशक उत्पादक कंपन्यांकडून दर मागवले. तीन कंपन्यांचे कोटेशन प्राप्त झाल्यानंतर सहाही विभागांसाठी प्रत्येकी ४ लाख याप्रमाणे एकूण २४ लाखांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. लवकरच निविदा प्रक्रिया राबवून औषध खरेदी केली जाईल. प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव महासभेपुढे ठेवण्यात आला आहे. महापालिकेच्या चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात या कामासाठी विभागनिहाय ४.५ लाख याप्रमाणे २७ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. उद्यान अधीक्षकांनी तांत्रिक मान्यता दिल्याने निविदा प्रक्रिया पूर्ण होताच सहाही विभागांत एकाच वेळी फवारणी सुरू होणार आहे. महासभेची मंजुरी मिळाल्यानंतर पावसाळ्यात वाढणाऱ्या तणावर वेळीच नियंत्रण मिळवून नागरिकांना डासांपासून दिलासा देण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.
-----------------