टूडे साठी
-----------
गंगापूर धरणातील मृतसाठा उचलणार
चर खोदकामासाठी ११.६५ कोटींची निविदा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २६ : पावसाचे आगमन लांबण्याची भीती आणि वाढता पाणीसाठ्याचा ताण लक्षात घेऊन महापालिकेने दोन पातळ्यांवर पावले उचलली आहेत. शहरात टप्प्याटप्प्याने पाणीकपात लागू करत असतानाच गंगापूर धरणाच्या तळातील पाणी वापरात आणण्यासाठी धरणात चर खोदण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामाच्या निविदा काढल्या जाणार आहेत. सुमारे ११.६५ कोटी रुपये खर्चाचे हे काम असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर यांनी दिली.
नाशिक शहराची तहान मुख्यतः गंगापूर धरण भागवते. मुकणे व दारणा धरणांतूनही काही प्रमाणात पाणी येते. शहरासाठी ६४०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आरक्षण आहे. सध्या रोज ६०० दशलक्ष लिटर पाणी उचलले जाते. हवामान खात्याने अल-निनोचा प्रभाव सांगत पाऊस उशिरा येण्याचा अंदाज दिला आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने ३१ जुलैऐवजी ३१ ऑगस्टपर्यंत पाणी पुरवण्याच्या सूचना केल्या आहेत. सध्याचा उपलब्ध साठा १२ ऑगस्टपर्यंतच पुरणार आहे. पुढील १८ दिवसांची तूट भरून काढण्यासाठी महापालिकेने जून- जुलैमध्ये दर शनिवारी शहरभर पाणी बंद ठेवण्याचे ठरवले आहे. ऑगस्टमध्ये तर एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. पाणीकपातीसोबतच धरणाच्या तळातील पाणी जॅकवेलपर्यंत आणण्यासाठी चर खोदला जाणार आहे. धरणाची पातळी ५९८ मीटरच्या खाली गेल्यास जॅकवेल कोरडे पडते. त्यामुळे चर खोदून मृतसाठा वळवला जाणार आहे. मात्र मार्गात मोठे खडक आहेत. धरण मातीचे असल्याने स्फोटकांचा वापर धोकादायक ठरू शकतो. म्हणून विशेष तंत्राने खडक फोडून चर खोदला जाईल. फोरस्ट्रेस या सल्लागार कंपनीने खर्चाचा अहवाल दिला आहे. त्यानुसार ११.६५ कोटींचे अंदाजपत्रक तयार झाले असून आयुक्तांच्या मान्यतेसाठी प्रस्ताव गेला आहे.
-----कोट----------
३१ ऑगस्टपर्यंत पाणी पुरवायचे असल्याने मृतसाठा वापरावाच लागेल. त्यासाठी धरणात चर खोदणे आवश्यक आहे.
- रवींद्र धारणकर, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग.