टूडे साठी
-----------
सिंहस्थाच्या खर्चानंतरही महापालिका श्रीमंत
ठेवींचा आकडा २५६१ कोटींवर; आर्थिक व्यवस्थापन सक्षम
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २६ : सिंहस्थ कामांचा प्रचंड आर्थिक बोजा असतानाही महापालिकेची तिजोरी मजबूत असल्याचे समोर आले आहे. आर्थिक नियोजनामुळे महापालिकेच्या विविध बँकांतील ठेवी २५६१ कोटी रुपयांवर पोचल्या आहेत. गेल्या दोन वर्षांत या ठेवींत तब्बल १२०० कोटींची वाढ नोंदवली गेली आहे.
गतवर्षी हरित रोख्यांमधून २०० कोटी, म्युनिसिपल बॉण्डमधून २०० कोटी असे एकूण ४०० कोटी उभारण्यात आले. त्याशिवाय अखर्चिक निधी, करसवलत योजनेतून जमा झालेले ११४ कोटी, जीएसटी अनुदानाचे २५० कोटी आणि ३१ मार्चअखेर शिल्लक ३०० कोटींचा निधी प्रशासनाने अल्पमुदतीच्या ठेवींत गुंतवला. त्यामुळे केवळ अडीच महिन्यांत ठेवींचा आकडा १२०० कोटींनी वाढला. ३१ मार्च २०२४ ला महापालिकेच्या ठेवी १३९३ कोटी होत्या. ३१ मार्च २०२५ ला त्या १५२१ कोटींवर गेल्या. काही ठेवींचे रोखीकरण करून विकासकामांची देयके दिल्यानंतरही १५ जून २०२६ पर्यंत ठेवी २५६१ कोटींवर पोहोचल्या आहेत. महापालिकेने आठ राष्ट्रीयकृत बँकांसह एचडीएफसी व आयसीआयसीआय या खासगी बँकांतही ठेवी ठेवल्या आहेत. सुरक्षा अनामत, घसारा निधी, विकास शुल्क, भविष्यनिर्वाह निधी, निवृत्तिवेतन निधी, ग्रीन बॉण्ड, सिंहस्थ मनपा हिस्सा, कामगार कल्याण निधी, पीपीपी हॅम प्रोजेक्ट अशा विविध हेडखालील निधी ठेवींत गुंतवला जातो. या ठेवींमधून महापालिकेला व्याजापोटीही उत्पन्न मिळते.मात्र यातील मोठा हिस्सा सिंहस्थ कामांसाठी राखीव आहे. कामे पूर्ण होताच देयके अदा करण्यासाठी टप्प्याटप्प्याने ठेवींचे रोखीकरण करावे लागणार आहे. कर्मचाऱ्यांच्या योजना व इतर बंधनकारक बाबींसाठीचा निधी वगळता उर्वरित रक्कम सिंहस्थासाठीच खर्च होणार आहे. सिंहस्थाचा खर्च समोर असतानाही ठेवी वाढल्याने महापालिकेचे आर्थिक व्यवस्थापन सक्षम असल्याचे दिसून येते. मात्र आगामी काळात सिंहस्थाची देयके द्यावी लागणार असल्याने ठेवी मोडण्याचे देखील नियोजन आहे.
---------कोट----------
महापालिकेकडे विविध मार्गाने येणारा निधी तातडीने खर्च न करता गरजेनुसार राष्ट्रीयकृत बँकांत अल्प किंवा दीर्घ मुदतीच्या ठेवींत गुंतवला जातो. मुदत संपल्यावर रोखीकरण केले जाते किंवा पुन्हा नव्याने गुंतवणूक केली जाते.
- दत्तात्रेय पाथरूट, मुख्य लेखा व वित्त अधिकारी.
------------------